सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमचा इलाज करण्याचे धोरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी खंबाटकी घाटासह पुण्यातील नवले ब्रिजची पाहणी करत असताना वाहतूक कोंडीच्या व वारंवार होणाऱ्या अपघातांची माहिती घेतली. विशेषत: पुणे ते सातारा या अंतरातील प्रवास एक तासावर आणण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला आहे. या डीपीआरमध्ये अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे ना. गडकरी यांनी सांगितले.
पुणे शहरातच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होवून प्रवाशांचा वेळ जातो. या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्ग अधिक सुरक्षित व वेगवान करण्यासाठी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. पुणे-नगर महामार्ग, पुणे-सातारा मार्ग, वेस्टर्न बायपास, सेवा रस्ते, फ्लायओव्हर्स, ट्रक पार्किंग, अतिक्रमण हटाव आणि वन्यजीव संरक्षण अशा विविध स्तरांवर तब्बल हजारो कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
पुणे-सातारा मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुण्यात नव्याने फ्लायओव्हर्स बहुपदरी स्वरूपात उभारले जाणार असून शहरातील प्रमुख चौकांमधील प्रवास वेळेत मोठी बचत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर ते सातारा साडेतीन तासांत
छत्रपती संभाजीनगर ते सातारा दरम्यान थेट जाणाऱ्या महामार्गाचे काम एकत्रित नसले तरी हा प्रवास छ. संभाजीनगर ते पुणे व पुणे ते सातारा एनएच 48 मार्गे होतो. पुणे ते सातारा रस्त्याचे काम आणि पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे चे काम वेगाने सुरू आहे. नवीन मार्गामुळे संभाजीनगर ते पुणे प्रवास अवघ्या 2 तास 15 मिनिटांत पूर्ण होणे शक्य होणार आहे. पहिल्या टप्प्यात खराडी ते शिरूर दरम्यान उन्नत महामार्ग आणि दुसऱ्या टप्प्यात शिरूर ते थेट समृद्धी महामार्गापर्यंत 192 किलोमीटरचा नवीन ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे बांधण्यात येत आहे. तसेच सातारा ते पुणे रस्त्याच्या नवीन डीपीआरमुळे हा प्रवास 1 तासात होऊ शकतो. त्यामुळे छ. संभाजीनगर ते सातारा या प्रवासासाठी सव्वातीन ते साडेतीन तास एवढा कमी कालावधी लागेल, असा अंदाज ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
पुणे-सातारा वेस्टर्न बायपाससाठी 6 हजार कोटींचा डीपीआर
पुणे-सातारा वेस्टर्न बायपास प्रकल्पासाठी तब्बल 6 हजार कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहरातील जड वाहतूक बाहेरून वळवण्यास मदत होणार आहे. नव्याने 140 किलो मीटर अंतराचा नवीन डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहनसंख्या लक्षात घेऊन या मार्गावरही स्वतंत्र फ्लायओव्हर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खंडाळा, शिरवळ आणि इतर वाहतूक कोंडीच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन सुरू आहे. विशेषतः औद्योगिक वाहतूक आणि मालवाहतूक ट्रकांमुळे निर्माण होणारी गर्दी कमी करण्यासाठी हे फ्लायओव्हर्स महत्त्वाचे ठरणार आहेत.