सातारा

Pudhari Impact: ‘पुढारी‌’च्या दणक्याने स्पीडब्रेकर हटले

रहिमतपूर-सातारा मार्गावरील प्रवास झाला सुखकर

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव : रहिमतपूर ते सातारा दरम्यानच्या राज्य महामार्ग क्रमांक 140 वरील कथित अनधिकृत व धोकादायक स्पीड ब्रेकरमुळे वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अखेर काही स्पीड ब्रेकर हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. नागरिकांचा तीव्र विरोध, सोशल मीडियावरील प्रतिक्रिया आणि दैनिक ‌‘पुढारी‌’ने या विषयावर प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर प्रशासनाने कार्यवाही केल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांत या मार्गावरील स्पीड ब्रेकरमुळे अनेक अपघात झाल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. तसेच अनेक वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनांमुळे सातारा जिल्हाभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी स्पीड ब्रेकरमुळे झालेल्या अपघातांचे अनुभव मांडत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.

जैतापूर परिसरात 22 मे रोजी झालेल्या एका अपघातात 22 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर दैनिक ‌‘पुढारी‌’ने या विषयाला वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने 29 मेपासून काही स्पीड ब्रेकर हटवण्यास सुरुवात केली. मात्र नागरिकांनी सर्व 48 स्पीड ब्रेकर तातडीने हटवावेत, अशी मागणी कायम ठेवली आहे.

दरम्यान, नागरिकांनी भविष्यात अशा प्रकारची नियमबाह्य कामे होऊ नयेत यासाठी कठोर धोरण राबवण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने काही स्पीड ब्रेकर हटवण्यास सुरुवात केली असली तरी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई आणि अपघातग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT