सातारा : पुणे- बंगळूर महामार्गावरील शेंद्रे ते पाचवड मार्गावरील सेवा रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला आहे. यासह महामार्गाची जिवघेणी स्थिती दाखवणारी ‘मृत्यूचा महामार्ग’ ही दै.‘पुढारी’ची वृत्तमालिका प्रसिध्द होताच संबंधित यंत्रणेला खडबडून जाग आली. महामार्ग प्राधिकरणाकडून लिंबखिंड ते पाचवड मार्गावरील सेवा रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. याचबरोबर खंबाटकी घाटातही डांबरीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे युद्धपातळीवर बुजवण्याचे काम सुरू केले आहे.
दरम्यान, दुरूस्तीच्या कामात सातत्य व दर्जेदारपणा ठेवण्याची मागणी होत आहे. महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. वाहन चालक व प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक बनलेल्या या मार्गावर अनेक अपघात घडत आहेत. या मार्गाकडे संबंधित यंत्रणेने केलेल्या दुर्लक्षामुळे प्रवासी व नागरिकांमधून तीव्र भावना व्यक्त होत होत्या. यावर आक्रमक भूमिका घेत दै.‘पुढारी’ने महामार्ग प्राधिकरणाच्या कामकाजाचा पर्दाफाश केला.
सातारा जिल्ह्यातील शिरवळ ते मालखेड या दरम्यान असणाऱ्या महामार्गाच्या दुरवस्थेबाबत ‘पुढारी’ने आवाज उठवला. तसेच महामार्गावरील पडलेले खड्डे, धोकादायक डायव्हर्शन, पुलांचे अपूर्ण काम, दुर्दशा झालेले सेवा रस्ते याची चिरफाड केली. चार दिवस सुरू असलेल्या या वृत्तमालिकेमुळे अखेर महामार्ग प्राधिकरणाला जाग आली आहे. ‘पुढारी’च्या भूमिकेमुळे लिंबखिंड ते पाचवड या मार्गावर सेवा रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.