सातारा : एसपी निखिल पिंगळे हे अत्यंत डॅशिंग पोलिस अधिकारी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यांच्यातील हळवा काव्यप्रेमी ‘पुढारी’त पहायला मिळाला. शाळेच्या जीवनातील शिक्षकांविषयीचा त्यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, माझ्या आजोबांसह तीन पिढ्यांना ज्यांनी शिकवलं, ते शिक्षक आपले आयुष्य म्हणजे समिधा आहेत, असे म्हणत, 'संमिधाच सख्या या त्यात कसा ओलावा... कोठून फुलापरी वा मकरंद मिळावा... जात्याच रुक्ष त्या आकांक्षा ... तो अंतर अग्नी क्षणभर तरी पेटवावा... आपल्या अंतरी असलेल्या अग्नीचे धगधगत्या ज्वालेत रूपांतर व्हावे, त्यातून देश पुढे जावा, अशा शब्दांत एसपी पिंगळे यांनी प्रखर देशभक्तीची भावना बोलून दाखवली. त्यांच्या वक्तृत्वाने ‘पुढारी एज्युदिशा’मध्ये प्रेरणा उफाळून आली.
पुढारी एज्यु दिशा प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर बोलताना एसपी निखिल पिंगळे म्हणाले, पुण्यात गुन्हे शाखेचा डीसीपी म्हणून कार्यरत असताना महिला व विद्यार्थी सुरक्षेसाठी आम्ही विशेष रोडमॅप तयार केला. त्यात १८० शैक्षणिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. त्यानंतर क्षीतिज नावाची मोठी कॉन्फरन्सही घेण्यात आली. आजच्या खासगी शैक्षणिक संस्था केवळ शिक्षण देण्यापुरत्या मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्याचे कामही करत आहेत.
पालक मोठ्या कष्टाने मुलांना शिक्षण देतात. मात्र, विद्यार्थ्यांवर योग्य लक्ष न ठेवल्यास काही चुकीच्या घटना घडू शकतात, असे सांगताना त्यांनी पुण्यातील एका विद्यार्थिनीच्या ब्लॅकमेलिंग प्रकरणाचा दाखला दिला. विद्यार्थ्यांच्या मनात काय सुरू आहे, याचा पालक आणि शैक्षणिक संस्थांनी वेळोवेळी अंदाज घेतला पाहिजे. कोणतीही बाब गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. ‘विद्यार्थ्यांचा खरा धर्म म्हणजे शिक्षण. पालकांच्या कष्टाचे चीज करत विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या अंतर्मनातील जिज्ञासा आणि जिद्दीची ज्योत कायम प्रज्वलित ठेवावी. हीच ऊर्जा देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल,’ असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात हरीश पाटणे म्हणाले, दै. ‘पुढारी’ हे जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे वृत्तपत्र असून यंदा १८ व्या एज्यूदिशा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना एकाच छताखाली विविध शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डाॅ. प्रतापसिंह जाधवसाहेब, ‘पुढारी’चे चेअरमन योगेशदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पुढारी’ची टीम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या ज्ञानयज्ञाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले म्हणाले, एज्यूदिशा हा विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त उपक्रम आहे. एका व्यासपीठावर अनेक शैक्षणिक संस्था विविध पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांची माहिती देत आहेत. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीतही बदल होत असून विज्ञान-तंत्रज्ञानाचा सर्वाधिक प्रभाव शिक्षण क्षेत्रावर पडला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार, क्षमतेनुसार आणि कौशल्यानुसार क्षेत्राची निवड करावी.
पुढारी एज्यु दिशा’ प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आता करिअर संधीचा खजिना खुला झाला. दि. ७ जूनपर्यंत साताऱ्यातील पोलिस करमणूक केंद्रात होत असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी थाटात झाले. या प्रदर्शनात शैक्षणिक क्षेत्रातील करिअरच्यादृष्टीने बहुविध माहिती, तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना मिळत असून प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक पंढरी अवतरल्याचे चित्र दिसून आले. विद्यार्थी व पालकांचा प्रचंड ओघ सुरु झाला आहे. दरम्यान, जिल्हा पोलिस प्रमुख निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी वर्ग भारावून गेला.
दिमाखदार सोहळ्यात या प्रदर्शनाला प्रारंभ झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांनी तोबा गर्दी केली. पहिल्याच दिवशी विविध तज्ञांनी फार्मसी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व त्यामधील करिअरच्या संधी तसेच मेडिकल व इंजिनिअरींग, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परिक्षांची तयारी व त्याविषयी मार्गदर्शन, करिअर गाईडन्स अशा विविध विषयावर केलेल्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. तज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी सकाळपासून पोलिस करमणूक केंद्रात गर्दी झाली होती. मार्गदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसनही वक्ते करत असल्याने विद्यार्थी एकाग्र होवून लक्ष देत होते. जिल्हा पोलिस प्रमुख निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी वर्ग खुष झाला. त्यांना एकप्रकारे टॉनिक देण्याचेच काम त्यांनी केले. अत्यंत ओघवत्या व प्रवाही भाषेत एसपींनी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये जान आणली.
प्रत्येक वक्त्याच्या मार्गदर्शनाला गर्दी होत होती. विविध शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलला भेटी देवून विद्यार्थ्यांसह पालक संबंधित कॉलेजमधील विविध उपक्रम, शैक्षणिक फी आदींची माहिती घेत होते. एकाच छताखाली करिअरचे अगणित पर्याय पारंपारिक कोर्सेसच्या पलीकडे जाऊन भविष्याचा वेध घेणारे अनेक पर्याय या प्रदर्शनात एकाच छताखाली उपलब्ध झाले आहेत. यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, डिफेन्स, फार्मसी यासोबतच आजच्या काळातील अत्यंत गतिमान अशा एआय, डेटा सायन्स, रोबोटिक्स, ॲग्रो-टेक, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, रिसर्च आणि डिझाईन यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील करिअरच्या सुवर्णसंधींची माहिती थेट तज्ज्ञांकडून दिली जात आहे. यावर्षी विशेषतः न्यू एज स्किल्स आणि ग्लोबल स्टडी अपॉर्च्युनिटीज (परदेशातील शिक्षणाच्या संधी) या घटकांवर अधिक भर दिला आहे.
दरम्यान, साताऱ्यात ५, ६, ७ जून असे तीन दिवस सुरु राहणाऱ्या या शैक्षणिक उपक्रमाचे मुख्य प्रायोजक संजय घोडावत युनिव्हर्सिटी आहेत. तर पावर्ड बाय प्रायोजक म्हणून विश्वकर्मा युनिव्हर्सिटी पुणे हे लाभले आहेत. सहयोगी प्रायोजक म्हणून एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी तर सहप्रायोजक म्हणून चाटे ग्रुप या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.