Pudhari Edu Disha: फुलला ‘पुढारी’चा ज्ञानयज्ञ; खुलले विद्यार्थ्यांचे चेहरे  Pudhari
सातारा

Pudhari Edu Disha: फुलला ‘पुढारी’चा ज्ञानयज्ञ; खुलले विद्यार्थ्यांचे चेहरे

‘एज्युदिशा’ शैक्षणिक प्रदर्शनाचा शानदार समारोप : करिअरला दिशा मिळाल्याची भावना

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सलग तीन दिवस चाललेल्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत दै. ‌‘पुढारी‌’ एज्युदिशा प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. ‌‘या प्रदर्शनामुळे अनेक शंकांचे निरसन झाले असून हे प्रदर्शन आमच्यासाठी उज्ज्वल करिअरचा राजमार्ग ठरणारे आहे,’ अशा भावना व्यक्त करताना विद्यार्थ्यांसह पालकांचेही चेहरे खुलले. दरम्यान, या शैक्षणिक प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला.

संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‌‘पुढारी एज्युदिशा‌’ हे प्रदर्शन गेले तीन दिवस पोलिस करमणूक केंद्रात सुरू होते. त्यामुळे पोलिस करमणूक केंद्र शिक्षणाचे जणू काही माहेरघर झाले होते. या शैक्षणिक प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. अखेरच्या दिवशीही दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, निवासी संपादक हरीश पाटणे, जाहिरात व्यवस्थापक मिलिंद भेडसगावकर, इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर व मान्यवरांच्या हस्ते गाैरव करण्यात आला.

दिमाखदार सोहळ्यात जिल्हा पोलिस प्रमुख निखिल पिंगळे यांच्या हस्ते शुक्रवारी या प्रदर्शनाला प्रारंभ झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांनी सलग तीन दिवस तोबा गर्दी केली. विविध तज्ञांनी फार्मसी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व त्यामधील करिअरच्या संधी तसेच मेडिकल व इंजिनिअरींग, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परिक्षांची तयारी व त्याविषयी मार्गदर्शन, करिअर गाईडन्स अशा विविध विषयावर केलेल्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. तज्ज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी सकाळपासून पोलिस करमणूक केंद्रात गर्दी होत होती.

मार्गदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसनही वक्ते करत असल्याने विद्यार्थी एकाग्र होवून लक्ष देत होते. प्रत्येक वक्त्याच्या मार्गदर्शनाला गर्दी होत होती. विविध शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलला भेटी देवून विद्यार्थ्यांसह पालक संबंधित कॉलेजमधील विविध उपक्रम, शैक्षणिक फी आदींची माहिती घेत होते.

सलग तीन दिवसांमध्ये झालेली नामवंत तज्ञांची व्याख्याने आणि विविध स्टॉल्सवर मिळालेली बहुमोल माहिती यामुळे विद्यार्थी व पालकांमधील शैक्षणिक प्रवेशाच्यादृष्टीने असलेली संभ्रमावस्था दूर झाली. याबाबत पालक व विद्यार्थ्यांनी ‌‘पुढारी‌’ला धन्यवाद दिले. तीन दिवसात विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विविध शैक्षणिक स्टॉल्सद्वारे कोणी इन्स्टिट्यूट अथवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यावा, याची इत्थंभूत माहितीही विद्यार्थ्यांना मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT