पुसेसावळी : पुसेसावळी गावातील कचर्यांच्या वाढत्या समस्येबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत असताना दैनिक ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन जागे झाले आहे. गावातील विविध भागांत दीर्घकाळ साचलेला कचरा तातडीने उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
यापूर्वी गावातील रस्त्यांवर व मोकळ्या जागेत पडून राहिलेल्या प्लॅस्टिक, कुजलेल्या भाज्या, कपडे व इतर ओला-सुक्या कचर्यामुळे अस्वच्छता, दुर्गंधी आणि आजारांचा धोका वाढला होता. ग्रामस्थांनी आरोग्यावरील संकटाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते.
पंचायत समिती खटाव वडूजचे गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी आय. ए. शेख, पाणी व स्वच्छता विभागाचे राजेश इंगळे, स्वच्छ भारत मिशन पंचायत समिती खटावचे मारुती बनसोडे, पुसेसावळी ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मी जाधव यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कचरा हटवला. परिसर निर्जंतुक करण्यासह साफसफाई करण्यात आली. तसेच, येथून पुढे या ठिकाणी कोणीही कचरा टाकू नये म्हणून स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी पुन्हा कचरा टाकला जाईल तेथे दंडात्मक कारवाई केली जाईल. यासाठी संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्यांची नोंद ठेवण्यात येणार असून ‘कचरा टाकल्यास दंड’ असे स्पष्टपणे लिहिलेले फ्लेक्सबोर्ड लावले जाणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी लक्ष्मी जाधव यांनी दिली आहे.
नागरिकांनीही जबाबदारी स्वीकारून कचरा व्यवस्थापनात सहभाग घ्यावा...
समृद्ध ग्राम अभियानांतर्गत गावांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे लागेल. ग्रामपंचायतीच्या या कारवाईमुळे ग्रामस्थांत समाधानाची भावना निर्माण झाली असली तरी यापुढे नागरिकांनीही जबाबदारी स्वीकारून कचरा व्यवस्थापनात सहभाग घेणे आवश्यक असल्याची अपेक्षा ग्रामपंचायत प्रशासनाने व्यक्त केली आहे.