सासपडेकरांचा सातार्‍यात ‘आक्रोश’  
सातारा

Satara News : सासपडेकरांचा सातार्‍यात ‘आक्रोश’

मोर्चात पोलिसांविरोधात संताप : सीआयडी चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : शाळकरी मुलीच्या खूनप्रकरणी संशयिताला फाशीची शिक्षा व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी सासपडे (ता. सातारा) येथील गावकर्‍यांनी सोमवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढला. आंदोलनकर्त्यांनी भर उन्हात ठिय्या मांडला होता. संशयित पहिल्या गुन्ह्यात निर्दोष झाल्याने व 9 महिन्यांपूर्वी युवतीचा मृतदेह सापडल्या प्रकरणात योग्य तपास न झाल्याने पोलिसांविरोधात महिलांनी संताप व्यक्त केला. त्यांनी पालकमंत्र्यांबाबतही नाराजी व्यक्त केली. दरम्यान, घटनेचा निषेध म्हणून यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. दरम्यान, नराधम राहुल यादववर दाखल असलेल्या गुन्ह्याची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

चार दिवसांपूर्वी 13 वर्षीय शाळकरी मुलीचा राहुल यादव याने निर्घृण खून केला. घरात मुलगी एकटी असल्याचे पाहून मुलीला मारहाण करत तिला जोरदारपणे जमिनीवर आपटले. या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती गतप्राण झाली. ही घटना समोर आल्यानंतर संशयित आरोपीविरोधात जनक्षोभ उसळला. संशयिताच्या घराला टार्गेट करत जमावाने घराची तोडफोड केली. मुलीच्या क्रूर हत्येने समाजमन अक्षरश: सुन्न झाले. या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी सासपडेसह, हरपळवाडी, गणेशवाडी या गावांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.

सोमवारी दुपारी सासपडेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी तसेच विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी पोवई नाका येथे एकत्र जमले. शेकडो नागरिकांनी आक्रोश मोर्चात सहभाग घेतला. दुपारी 1 वाजता आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. यानंतर मुलीच्या आई-वडीलांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून संशयित नराधम राहूल यादव याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, पीडित कुटुंबियांना शासनाने मदत करुन मुलीच्या भावाला शासकीय नोकरी द्यावी, यापूर्वी संशयित आरोपी राहूल यादव पोक्सोच्या गुन्ह्यातून कसा निर्दोष झाला? तसेच 9 महिन्यांपूर्वी एका युवतीचा मृतदेह सापडल्यानंतर राहूल यादव याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. मग तपास योग्य का झाला नाही. यामुळे या प्रकरणातील संबंधित सर्वच पोलिस अधिकार्‍यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, बोरगाव पोलिस ठाण्याच्या तत्कालिन अधिकार्‍यांची एसआयटी चौकशी करावी, तसेच संशयित यादववर दाखल असलेल्या पहिल्या गुन्ह्याचा तपास सीआयडीमार्फत करावा, अशी जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा येणार असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासाठी 1 डीवायएसपी, 3 पोलिस निरीक्षक, 8 इतर अधिकारी, 50 पोलिस कर्मचारी, होमगार्ड तसेच 5 पोलिस व्हॅन बंदोबस्तासाठी तैनात होत्या. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी व सासपडे ग्रामस्थ यांच्यावतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, सासवड येथील मुलीच्या खुनाची घटना ही मानवतेला काळीमा फासणारी आहे. आरोपी हा महिलांवर अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार असून तो समाजाला घातक आहे. त्यामुळे त्याचे कोणत्याही वकीलांनी वकील पत्र घेवू नये असे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांतर्फे व सासपडे व आसपासच्या पंचक्रोशीतील नागरिकांतर्फे आपल्या वकील संघटनेला आवाहन करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT