Hyena Habitat 
सातारा

Satara News : माणच्या माळरानात तरसांच्या अधिवासाचे रक्षण

जागतिक तरसदिनानिमित्त विशेष सप्ताह : वन्यजीव निरीक्षणाद्वारे संवर्धनाचा जागर

पुढारी वृत्तसेवा

सातारा : माणच्या माळरानात तरसांच्या अधिवासाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोमवारी जागतिक तरस दिनाच्या पार्श्वभूमीवर किरकसाल संवर्धन प्रकल्पाच्या विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वन्यप्राण्यांसाठी पाणवठे भरणे आणि वन्यजीव निरीक्षणाद्वारे तरस संवर्धनाचा जागर केला जाणार आहे.

येत्या 27 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक तरस दिनाचे औचित्य साधून, माण तालुक्यातील किरकसाल संवर्धन प्रकल्पातर्फे 27 एप्रिल पर्यंत विशेष संवर्धन व जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये कोणताही सोहळा न करता प्रत्यक्ष माळरानात जाऊन तरसांच्या अधिवासाचे रक्षण करणे आणि उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन्यजीवांसाठी पाणी उपलब्ध करुन देणे, यावर मुख्य भर दिला जाणार आहे. किरकसाल संवर्धन प्रकल्पाने या सप्ताहाचे नियोजन केले आहे.

कडक उन्हाळ्यामुळे माळरानावरील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले आहेत. या काळात तरस आणि इतर वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठे भरण्याचे काम स्वयंसेवकांच्या मदतीने करण्यात येणार आहे. क्षेत्रीय संनियंत्रण व साईन सर्व्हे केला जाणार आहे.

या सप्ताहात प्रत्यक्ष पाऊलखुणा, विष्ठा आणि इतर खुणांवरून तरसांच्या हालचालींचे निरीक्षण केले जाईल. तसेच त्यांच्या गुहांचे संरक्षण आणि संनियंत्रण केले जाणार आहे. आरोग्यदूत जनजागृती केली जाणार आहे. मेंढपाळ आणि स्थानिक ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना तरसाच्या निसर्गातील महत्त्वाबद्दल माहिती दिली जाईल. मेलेली जनावरे फस्त करून तरस गाव रोगमुक्त कसे ठेवतो, हे सांगून लोकांमध्ये या प्राण्याबद्दल आदर निर्माण केला जाणार आहे. माण परिसरातील ज्येष्ठ नागरिकांकडून तरसाशी संबंधित जुन्या कथा आणि अनुभवांचे संकलन करून ही माहिती संवर्धनासाठी वापरली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT