वडूज : पुसेसावळी परिसरातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उरमोडी योजनेचे पाणी पाईपलाईनद्वारे लहान-मोठ्या तलावांमध्ये सोडण्याचा प्रस्ताव तयार केल्याचा असल्याची माहिती आ. मनोज घोरपडे यांनी दिली.
खटाव तालुक्यातील वडगाव येथील जयराम स्वामी मठात पर्यटन विकास निधीतून मंजूर झालेल्या कामाचे भूमिपूजन नुकतेच झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, धैर्यशील कदम, धनंजय चव्हाण, विद्या वेताळ, सी. एम. पाटील, मानसिंग माळवे, डॉ. प्रगती कोकाटे, सुनिता मगर उपस्थित होते.
डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी भाषणात राज्यात सत्ताधारी पक्षामार्फत विविध विकासकामे सुरू असल्याचे सांगितले. मात्र खटाव तालुक्यातील शेती पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याची खंत व्यक्त केली. यावर आ. घोरपडे यांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. उरमोडी योजनेचे पाणी पाईपलाईनद्वारे पाझर तलावात सोडण्याचा प्रस्ताव तयार असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. प्रिया शिंदे यांनीही जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे दोन मंत्री प्रभावीपणे काम करत असल्याचे सांगितले. त्यामुळे विकासकामांना गती मिळेल आणि पुढील भेटीपर्यंत पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. प्रास्ताविक मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज यांनी केले.