सातारा

उदयनराजेंसाठी मोदींची ३० रोजी कराडला सभा

दिनेश चोरगे

सातारा/कराड; पुढारी वृत्तसेवा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथे मंगळवार, दि. 30 एप्रिलला जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाचे सातारा लोकसभा निवडणूक प्रभारी अतुल भोसले यांची शिष्टाई कामी आली आहे. मोदींची ही सभा टोलेजंग होण्याच्या द़ृष्टीने व्यापक नियोजन केले जात आहे. सुमारे 20 एकर जागेवर ही सभा होणार आहे.

खा. उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांच्या प्रचाराला आणखी वेग आला आहे. खा. उदयनराजे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी यासाठी अतुल भोसले प्रयत्नशील होते. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोदींच्या सभेचे नियोजन करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला यशही आले.

कराड येथे शुक्रवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला अतुल भोसले, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड दक्षिण भाजपा तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, भाजपा कोअर कमिटी पदाधिकारी यांच्यासह भाजपची वरिष्ठ नेतेमंडळीही उपस्थित होती. या बैठकीत मोदींच्या सभेचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार 30 एप्रिलला मोदींची कराडला सभा होणार असून, सुमारे 20 एकर जागेवर या सभेचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. सभेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. कराड दक्षिण, कराड उत्तर व पाटण या तीन विधानसभा मतदारसंघांसाठी कराड हे मध्यवर्ती ठिकाण समजले जाते. त्यामुळे मोदींची सभा कराड येथे घेण्याचे निश्चित झाले. या सभेचा प्रभाव या तीन मतदारसंघांसह संपूर्ण सातारा जिल्हा त्याचबरोबर लगतच्या सांगली व कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांवरही राहणार आहे. त्याद़ृष्टीने ही सभा यशस्वी करण्यासाठी काटेकोर नियोजन केले जात आहे. 2019 मध्ये झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीवेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातार्‍यात सैनिक स्कूलच्या मैदानावर सभा झाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT