सातारा : दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक, पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्ताने कोल्हापुरात आयोजित केलेल्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याला सातारा जिल्ह्यातील मंत्र्यांनी व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून सोहळ्याला चार चाँद लावले. ‘पुढारी’ वृत्तपत्राचा चेहरा, प्रेरणा, आत्मा व दिशा असलेल्या या नेतृत्वाचा प्रचंड आवाका सर्वसामान्य जनतेचे जटील प्रश्नही चुटकीसारखे सोडवणारा व त्यांना न्याय मिळवून देणारा आहे. मुख्य संपादक म्हणून त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर आपली वेेगळी छाप पाडली. महाराष्ट्राच्या जडणघडणीतील खमक्या आवाज म्हणून अवघा महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो. त्यांनी प्रज्वलित केलेली सत्य, न्याय, विधायकता आणि माणुसकीची ज्योत पुढील अनेक दशकांपर्यंत समाजाला उजळत राहो, अशा प्रतिक्रिया सातारा जिल्ह्यातील मान्यवरांसह तमाम वाचकांनी व्यक्त केल्या आहेत.
पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे सातारा जिल्हावासियांना मोठे अप्रूप होते. कोल्हापुरातील या सोहळ्याचा सातारा जिल्ह्यातही मोठा गवगवा झाला. बुधवारी जिल्ह्यातील मंत्रीमहोदयांसह विविध स्तरातील लोकप्रतिनिधी, विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवर, वाचक, विक्रेते आदी या सोहळ्यासाठी पहाटेपासूनच मार्गस्थ झाले. डॉ. प्रतापसिंह जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी विराट गर्दी झाली होती. या गर्दीच्या साक्षीने सातारा जिल्ह्यातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. काही मान्यवरांना या कार्यक्रमालाउपस्थित राहता आले नाही, मात्र त्यांनी शुभेच्छा व्यक्त करुन डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या प्रती आदर व्यक्त केला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, आ. डॉ. अतुल भोसले, आ. महेश शिंदे, आ. मनोजदादा घोरपडे यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांना शुभेच्छा देताना त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला उजाळा दिला.
डॉ. जाधव यांनी पत्रकारितेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान दिले आहे. संपादक म्हणून वेगळा ठसा उमटवत आपल्या परखड व खमक्या लेखणीने सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. लोकांच्या जडणघडणीत त्यांचे स्थान अढळ आहे. ‘पुढारी’ची जनतेशी नाळ जोडली गेली. कारगील युद्ध असो वा किल्लारीचा भूकंप कोणतेही संकट असले तरी मदतीसाठी डॉ. प्रतापसिंह जाधव कायम अग्रभागी रहात असून ही बांधिलकीची वीण त्यांनी घट्ट केली. त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे असल्याच्या प्रतिक्रिया सातारा जिल्ह्यातून व्यक्त झाल्या.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, मंत्री मकरंद पाटील, खा. नितीनकाका पाटील, आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार आनंदराव पाटील, उद्योजक बाळासाहेब वाघ, उद्योजक दीपक पाटील, किरण साबळे-पाटील, तेजस्विनी भिलारे, जतीन भिलारे, वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, कोटा ॲकॅडमीचे अध्यक्ष महेश खुस्पे, अजितदादा गटाचे कराड तालुकाध्यक्ष जितेंद्र डुबल, गीता धावडे, हेमा करंबे, रतन लाड, श्वेता गावडे, पौर्णिमा शिंदे, वैशाली पवार, अरुणा राजेमहाडिक, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दीपक चव्हाण, मदन भोसले, डॉ. दिलीप येळगावकर, सदाशिव सपकाळ, श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, प्राचार्य रमणलाल शहा, फरोख कूपर, डॉ. राजेंद्र सरकाळे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, ॲड. कमलेश पिसाळ, अजित मुथा, डॉ. चेतना सिन्हा, सुनील पोरे, संग्राम घोरपडे, राजूभैय्या भोसले, सुनील काटकर, काका धुमाळ, नरेंद्र पाटील, ॲड. डी. जी. बनकर, अमोल मोहिते, अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, मनोज शेंडे, शंकर माळवदे, शेखर मोरे-पाटील, सुहास राजेशिर्के, सुजाता राजेमहाडिक, सुवर्णा पाटील, दीपक पवार, राजेंद्रशेठ राजपुरे, आदिंनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांना सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
पत्रमहर्षी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त ‘सिंहायन’ या त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. खरे तर बाळासाहेब उर्फ डॉ. प्रतापसिंह जाधव यांची आतापर्यंतची वाटचाल पाहिली तर ती सिंहासारखीच आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्रालादेखील योग्य शीर्षक दिले आहे. राजघराण्याचे आणि डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या घराण्याचे पहिल्यापासूनच ऋणानुबंध आहेत. दैनिकाचा संपादक मनात आले तर काय करु शकतो, याचे डॉ. प्रतापसिंह जाधव हे जिवंत उदाहरण आहेत. त्यांना सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा.- खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, सातारा
सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आम्हा सर्वांना मनापासून आनंद आहे की आज पत्रमहर्षी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासारखे नेतृत्व आमच्या या विभागाला मिळालं. अनेक प्रश्नांना ‘पुढारी’च्या माध्यमातून त्यांनी वाचा फोडली. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी त्यांचा आवाज बनण्याचे काम डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले आहे. आम्हाला त्यांचे कायम मार्गदर्शन होतेच, इथून पुढच्या काळातही ते असेच मिळत रहावे, त्यांना 80 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.- ना. शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य.
दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या पाच दशकांच्या पत्रकारितेचा प्रवास म्हणजे पत्रकारितेचा एक इतिहास आहे. ‘सिंहायन’ या आत्मचरित्रातून त्यांनी केवळ स्वतःचा प्रवास नव्हे तर मराठी पत्रकारितेचा आत्मा शब्दबद्ध केला आहे. त्यांनी पत्रकारितेतून समाजाला दिशा दिली. पुढारी हे केवळ एक वृत्तपत्र नाही तर जनतेचा आवाज आहे. त्यांची कार्यशैली, बांधिलकी आणि प्रामाणिकपणा आजच्या पिढीसाठी आदर्शवत आहेत. पाच तपांचा हा प्रवास म्हणजे दृढ निश्चय, ध्येयवादी वृत्ती आणि असंख्य संघर्षांचा इतिहास आहे. अशा व्यक्तिमत्त्वाला ‘पद्मश्री’ हा सन्मान मिळणे म्हणजे समाजाचा आणि पत्रकारितेचा सन्मान आहे. त्यांचे ‘सिंहायन’ हे आत्मचरित्र भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.- ना. शंभूराज देसाई, पालकमंत्री सातारा
डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दै. ‘पुढारी’च्या माध्यमातून लढवय्या लोकांना पुढे आणले. आम्ही दुष्काळी भागाचा कायापालट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. या आमच्या कार्याला बळ देण्याचे काम डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले आहे. दै. ‘पुढारी’ची टीम कायमच आमच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिल्याने माण, खटाव या दोन्ही तालुक्यांतील दुष्काळ मिटवण्याचे शिवधनुष्य आम्ही पेलू शकलो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे ऋणानुबंध आहेत. आम्हाला त्यांचे असेच आशीर्वाद कायम मिळोत. त्यांना सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा.-ना. जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र