सातारा : स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाचा छत्रपती शिवरायांनी कोथळा बाहेर काढला. या ऐतिहासिक घटनेवेळी ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ हा प्रसंग इतिहासात अजरामर ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांचे महापराक्रमी अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांच्या यादरम्यानच्या अतुलनीय शौर्याचे स्मरण आता किल्ले प्रतापगडावर कायमस्वरूपी जतन होणार आहे.
अफझलखान वधाच्या निर्णायक क्षणी स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या या शूरवीराचा पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांच्या संयुक्त बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
बैठकीत किल्ले प्रतापगड परिसरातील पर्यटन विकास, वीर जिवाजी महाले स्मारकाची संकल्पना, निधीची उपलब्धता, जागेची निश्चिती तसेच प्रशासकीय मान्यतांबाबत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राच्या इतिहासातील वीर योद्ध्यांच्या पराक्रमाचे जतन करताना पर्यटनालाही चालना मिळावी, या दृष्टीने संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दोन्ही मंत्रिमहोदयांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीस पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सदस्य सचिव विजय पोवार, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, वन विभाग, जलसंपदा विभाग तसेच अन्य संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पर्यटन विभागाच्या ६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी 'छत्रपती शिवाजी महाराज सृष्टी' हा पर्यटन विकास प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी १० कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये शिवकालीन इतिहासाचे दर्शन घडवणारे शिल्प, अँफिथिएटर, लाईट अँड साऊंड शो, पर्यटक सुविधा केंद्र, कॅफेटेरिया, प्रदर्शन दालन, सुशोभीकरण आदी विविध कामांचा समावेश आहे.
बैठकीदरम्यान वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाबाबत यापूर्वी झालेल्या पत्रव्यवहाराचा आणि प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन पूर्णाकृती पुतळा व स्वतंत्र स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मारकासाठी आवश्यक जागा निश्चित करून प्रस्ताव अंतिम करण्याबरोबरच निधी उपलब्ध करून काम सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. दरम्यान, जावली तालुक्यातील मुनावळे येथे कोयना जलाशयावर सुरू करण्यात आलेल्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन केंद्राच्या कामांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.
यावेळी ना. शिवेंद्रराजेंनी कामे गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. बैठकीत आवश्यक असलेल्या अत्याधुनिक सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात आला. ज्या उपकरणांचा पुरवठा झाला आहे ती तातडीने कार्यान्वित करण्याचे, निविदा प्रक्रियेत असलेली कामे निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश ना. शिवेंद्रराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.