सातारा : सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकासाचे प्रयत्न सुरु आहेत. आता कोयनानगर येथील नेहरु उद्यान आणि प्रतापगड किल्ल्यावरील पर्यटनाच्या अनुषंगाने प्रस्तावित कामे हाती घेतली जाणार आहेत, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ना. देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या पर्यटनवृध्दीच्या दृष्टिने महत्वाचे असणारे दोन प्रकल्प पर्यटन विभागाने हाती घेतले आहेत. पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे नेहरु उद्यान हे पर्यटन केंद्र आहे. 9 एकरातील या उद्यानाचा पर्यटनाच्या अनुषंगाने विकास केला जाणार आहे. सध्या हे उद्यान जलसंपदा विभागाच्या ताब्यात आहे. येथे विकासकामे करण्यासाठी जलसंपदा विभागाची ना हरकत लागणार असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. या ठिकाणी 40 कोटी रुपये खर्चून अद्ययावत असे नेहरु उद्यान उभारण्यात येणार आहे. नेहरु उद्यानात प्रशस्त असा स्काय वॉक तयार केला जाणार आहे.
प्रतापगड किल्ल्यावर गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कामे हाती घेतली आहेत. किल्ल्यावरील ऐतिहासिक तळ्यांचे जतन करण्यासोबत त्याला झरे पुर्ववत करण्यात येणार आहेत. या कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे, असेही ना. देसाई यांनी सांगितले. पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते वारंवार खराब होऊ नयेत, म्हणून या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना संबंधित नगरपालिकांच्या मुख्याधिकार्यांना केल्या आहेत, असेही ते म्हणाले.
उपराष्ट्रपती निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये क्रॉस वोटिंग झाले. त्याच्या संशयाची सुई उबाठा गटावरच आली आहे, अशी कोपरखळीही ना. देसाई यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात मारली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा काढलेला जीआर हा कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे, असेही ना. देसाई यांनी सांगितले.
अजिंक्यतारा किल्ल्यावर भगवा ध्वज...
राजधानी सातार्यात असणार्या अजिंक्यतारा किल्ल्यावर भव्य असा भगवा ध्वज उभारण्यात येणार असून या ध्वजस्तंभाभोवती सोलर विजेमार्फत प्रकाशझोताची सोय करण्यात येणार आहे. महामार्गावरील लिंब खिंड आणि खिंडवाडी येथूनही या भगव्या ध्वजाकडे रात्रीच्यावेळी लक्ष जाईल, असेही ना. देसाई यांनी स्पष्ट केले.