सातारा : किल्ले प्रतापगडाचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात समावेश करण्यात आला आहे. शनिवारी सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये किल्ले प्रतापगडाच्या रणसंग्रामाचा थरार दाखवण्यात आला असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला उजाळा देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आधोरेखित झाला आहे. किल्ले प्रतापगडास युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ म्हणून मानांकन मिळाले आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे. पश्चिम घाटाच्या खडतर पर्वतरांगांमध्ये उभा असलेला प्रतापगड किल्ला हा महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी1656 मध्ये हा किल्ला बांधला. मराठा इतिहासातील अनेक महत्त्वाचे प्रसंग या किल्ल्याने पाहिले आहेत. किल्ल्याची भक्कम तटबंदी आणि मजबूत बांधणी त्यांच्या सामरिक महत्वाची साक्ष देते. उंच शिखरावर उभा असलेला हा किल्ला सभोवतालच्या दर्याखोर्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचा होता.
प्रतापगडाच्या खर्या ऐतिहासिक महत्वाची ओळख 10 नोव्हेंबर 1659 रोजी झाली याच दिवशी या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात ऐतिहासिक युद्ध झाले. शिवाजी महाराजांनी कुशाग्र बुद्धी आणि उत्कृष्ट युद्धनीतीचा जोरावर अफजलखानाचा पराभव केला. या विजयामुळे मराठ्यांचे साम्राज्य आधिक मजबूत झाले. या लढाईनंतर शिवाजी महाराजांची किर्ती सर्वत्र पसरली. आजही प्रतापगडाचा प्रत्येक दगड त्या शौर्य गाथेची साक्ष देतो. किल्ल्यावर उभे राहिले की त्या ऐतिहासिक लढाईची आठवण होते. अफजलखानाच्या कबरीपासून शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यार्पंत प्रत्येक ठिकाणी इतिहास जिवंत जाणवतो. हा किल्ला म्हणजे मराठ्यांच्या स्वाभिमान आणि धैर्याचे प्रतिक आहे. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास चित्रीफितीद्वारे जिल्ह्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.
सातारा जिल्ह्याच्या द़ृष्टीने अभिमानाची असणारी गोष्ट म्हणजे प्रतापगड किल्ल्याचा जागतिक वारसास्थळामध्ये समावेश झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा आहे. या अमूल्य प्रसंगाचे चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शनिवारी परिपाठावेळी दाखवण्यात आले. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा करत प्रतापगडाच्या रणसंग्रामाचा थरार अनुभवला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सर्व शाळामध्ये राबविण्यात आला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी व माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली. किल्ले प्रतापगडास जगातील वारसा स्थळात स्थान मिळाल्याने जगभर या किल्ल्याचा डंका वाजणार आहे. तसेच देशासह अन्य देशातील पर्यटकांचा ओढाही वाढण्यास मदत होणार आहे.