सातारा : पोनि राजेंद्र मस्के यांच्याशी चर्चा करताना आंदोलनकर्ते अमोल कारंडे, अजय पवार, नामदेव इंगळे व इतर.  pudhari photo
सातारा

Bacchu Kadu protest | बच्चू कडूंसाठी प्रहार संघटनेने रोखला महामार्ग

फलटण, कराड येथे आज मुंडण आंदोलन करण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : दिव्यांग व विधवांना 6 हजार रुपये मानधन देण्यात यावे, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, यासह 17 मागण्यांसाठी दि. 8 जूनपासून बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी खिंडवाडी येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्यावतीने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सातारा शहर व तालुका पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, फलटण, कराड येथे दि. 13 रोजी मुंडण आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

सातार्‍यात प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्यावतीने महामार्गावर खिंडवाडी येथे महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. सातारा पोलिस दलाचे या आंदोलनाकडे लक्ष होते. प्रत्येक कार्यकर्त्यावर पोलिसांची पाळत होती. दिव्यांगाच्या संघटनांनी खिंडवाडी येथे आंदोलन करण्याचा निर्धार केला होता.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी कराड बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी लेन आडवली. सर्व वाहतूक पोलिसांनी सर्व्हीस रोडवरुन वळवली. परंतु तोपर्यंत वाहतूक कोंडी झाली. जोरदार घोषणाबाजी करत तब्बल अर्धा तास आंदोलन सुरु होते. सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलेश तांबे यांनी मध्यस्थी केली. तेथून लाँग मार्चने सातारा शहराकडे कुच केली. शहरात शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर अभिवादन करुन ठिय्या मारला. तेथे आंदोलन तुर्तास स्थगित केले.

यावेळी बोलताना अमोल कारंडे म्हणाले, हे आंदोलन टप्याटप्याने वाढवण्यात येणार असून दि. 13 रोजी फलटण आणि कराड येथे तहसील कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी शेतकर्‍यांना दिली जात नाही. दिव्यांगांना 6 हजार रुपये पेन्शन दिली जात नाही तोपर्यंत हा लढा लढत राहू.

या आंदोलनात प्रशांत बगले, दिलखुश गायकवाड, अमोल भातुसे, आनंदा पोतेकर, नामदेव इंगळे, गणेश पवार, अजय पवार, शैलेंद्र बोर्डे, सागर गावडे, महेश जगताप, प्रमोद गायकवाड, संग्राम इंगळे, सुरेखा सुर्यवंशी, चंद्रकांत नाळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा : आ. शशिकांत शिंदे

विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतकर्‍यांना दिलेलं कर्जमाफीचं आणि इतर मागण्यांचं आश्वासन भाजप सरकारने पूर्ण करावे. बच्चू कडू शेतकर्‍यांसाठी करत असलेल्या या उपोषणास माझा जाहीर पाठिंबा आहे. त्याचबरोबर उपोषण करत असताना बच्चू भाऊंनी स्वतःच्या तब्येतीची देखील तितकीच काळजी घ्यावी, असे मत आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT