सातारा : महावितरण कंपनीने मेंटेनेसच्या नावाखाली मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून शहरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित केला होता. त्यातच ढगाळ वातावरण व वार्यामुळे अनेक भागात वीज बंद करण्यात आली. दिवसभर बत्ती गुल झाल्याने नागरिकांमधून महावितरण विरोधात संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी महावितरण कार्यालयात फोन केला असता अधिकार्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली.
सातारा शहरासह परिसरात महावितरण कंपनीने मंगळवारी मेंटेनन्सची कामे हाती घेतली होती. मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत मेंटेनन्ससाठी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. त्यातच महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्याने नागरिकांची घालमेल झाली. सुमारे 7 ते 8 तास वीज पुरवठा बंद झाल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. शासकीय कार्यालयातील ऑनलाईन कामे, गिरणी, इलेक्ट्रिक दुकाने यासह अन्य दुकानातील कामे खोळंबली होती. त्यातच 6 नंतर ढगाळ वातावरण होत सोसाट्याचा वारा आला त्यामुळे महावितरण कडून पुन्हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे नागरिकांमधून महावितरण विरोधात संताप व्यक्त होत आहे.