Kaas Pathar Bamnoli Road Potholes
सातारा : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर फुले फुलायला सुरुवात झाली आहे. लवकरच हंगाम सुरू होणार असून, आतापासूनच पर्यटकांची पावले या निसर्गरम्य प्रदेशाकडे वळू लागली आहेत. मात्र, फुलांच्या या मनमोहक दर्शनापूर्वी पर्यटकांना खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांच्या जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. कास पठार ते बामणोलीकडे जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यामुळे अक्षरशः चाळण झाली असून, प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे पर्यटकांचा आनंद हिरावला जात आहे. पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सातारा शहरापासून घाटरस्त्याच्या पायथ्यापर्यंतचा रस्ता सुस्थितीत असला, तरी घाटरस्ता फाटा ते कास तलाव आणि पुढे कास गावापर्यंतचा प्रवास खराब रस्त्यामुळे अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या साईडपट्ट्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे खचल्या असून, ठिकाणी दोन दोन फूट खोल खड्डे पाडले आहेत.
यामुळे रस्ता अरुंद झाला असून, समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. हंगाम पूर्णपणे सुरू होण्याआधीच, सुट्टीच्या दिवशी या भागात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. नुकतेच रविवारी एक ट्रॅव्हल्स डिझेल संपल्याने रस्त्यातच बंद पडली. हा रस्ता अरुंद आणि खड्डेमय असल्याने इतर वाहनांना बाजूने पुढे जाणे अशक्य झाले. परिणामी रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
साईडपट्ट्या नसल्याने वाहनांनाबाजूला घेणेही शक्य नव्हते, ज्यामुळे एक ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक या गैरसोयीमुळे त्रस्त झाले असून, या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.