Satara Crime News | पोलिस मृत्यूप्रकरणी पत्नीसह 6 जणांवर गुन्हा Pudhari Photo
सातारा

Satara Crime News | पोलिस मृत्यूप्रकरणी पत्नीसह 6 जणांवर गुन्हा

खोटी केस मागे घेण्यासाठी 20 लाखांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : चार दिवसांपूर्वी सातार्‍यातील कोडोली येथे सासरवाडीमध्ये येऊन मुंबईतील बांद्रा पोलिस अमोल लक्ष्मण जाधव यांनी गळफास घेऊन जीवन संपवले होते. याप्रकरणी पोलिसाच्या पत्नीसह सहा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, 20 लाख रुपयांची मागणी झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

पत्नी कोमल अमोल जाधव (रा. सातारा), सूरज भोसले (रा. घाडगेवाडी ता. फलटण), प्रवीण अडसूळ, शिवाजी अडसूळ, सौरभ सकट, विवेक काटकर (सर्व रा.सातारा) अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी सचिन लक्ष्मण जाधव (वय 35, सध्या रा.मुंबई मूळ रा.सासवड झणझणे ता. फलटण) यांनी तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अमोल जाधव यांनी दि. 22 मे रोजी सातार्‍यात पत्नी कोमल जाधव यांच्या माहेरी गळफास घेवून आत्महत्या केली. शवविच्छेदन झाल्यानंतर सातारा पोलिसांनी कुटुंबियांना मृतदेह दिला.

दरम्यान, चार दिवसानंतर मात्र, मुंबई पोलिस अमोल जाधव यांच्या भावाने सातारा शहर पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोमल जाधव व सूरज भोसले या दोघांनी अमोल जाधव यांना मानसिक त्रास दिला. पत्नी कोमल यांनी अमोलचा दुसरा विवाह लावून दिला. त्यानंतरही कोमल यांनी अमोल यांच्यावर खोटी केस दाखल केली. त्यांचा मुलगा अद्वीक याला भेटू दिले जात नव्हते.

केस मागे घेण्यासाठी 20 लाख रुपयांची इतर संशयितांनी मागणी केली. पैसे दिले नाही तर नोकरी घालवतो, अशी धमकीही संशयितांनी दिली. या सर्व घटनेमुळे अमोल जाधव दडपणाखाली होते. आत्महत्येस प्रवृत्त केल्याने अमोल जाधव यांनी गळफास घेतला असल्याचे तक्रारीत सचिन जाधव यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT