सातारा : सातार्यात दुर्गादेवी प्रतिष्ठापनावेळी परवानगी न घेता मिरवणूक काढणे नवरात्रोत्सव मंडळांना अंगलट आले आहे. डीजे असलेल्या वाहनामुळे लोकांना त्रास होत असल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत एकूण तीन मंडळांवर गुन्हे दाखल केले. तसेच डीजेचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
जय भवानी सांस्कृतिक मंडळ, सदरबझार यांनी विना परवाना दुर्गादेवीची मिरवणूक काढली. तसेच या मिरवणुकीत मेन्टॉर साऊंड सिस्टीमचा आयशर टेम्पो मिरवणुकीत होता. यामुळे रहदारी करणार्या इतर वाहन चालकांना अटकाव झाला. पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष प्रज्वल महादेव जानकर (रा. सदरबझार) व साऊंड सिस्टिमचे मालक अमित ज्ञानेश्वर पवार (रा. सदरबझार) या दोघांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दुसरा गुन्हा महाराष्ट्र जोशी समाज तरुण मित्रमंडळ, गोडोली याचे अध्यक्ष प्रमोद नारायण साळुंखे (रा. गोडोली) यांच्यावर दाखल केला. या मंडळाने कोणतीही परवानगी न घेता दुर्गादेवीची मिरवणूक काढली. पोलिसांनी तिसरा गुन्हा श्रीमंत बालवीर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ कामाठीपुरा, गोडोली या मंडळाचे अध्यक्ष निलेश बाळासाहेब रसाळ (रा. कामाठीपुरा, सातारा) व साऊंड मालक प्रतिक माने (रा.डबेवाडी ता.सातारा) यांच्यावर दाखल केला. दुर्गादेवी आगमन मिरवणुकीची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
लल्लन जाधव फ्लेक्सप्रकरणी गुन्हा
सातार्यातील प्रतापसिंहनगर येथे लल्लन जाधव मित्र परिवार अशा आशयाचा असलेला फ्लेक्स लागला आहे. नवरात्र उत्सवानिमित्त शुभेच्छा देणारा हा फ्लेक्स महेश खुडे, छोट्या कांबळे, सोन्या पवार, जाधव यांनी लावला होता. हा फ्लेक्स विना परवाना लावला असल्याने सातारा शहर पोलिसांनी त्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.