भुईंज : दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री संध्या हिने अखेरचा श्वास घेतला. यानंतर अवघ्या चित्रपट क्षेत्रासह पिंजरा पुन्हा चर्चेत आला. पाच दशकापूर्वी मराठी चित्रपट क्षेत्रात पिंजरा या चित्रपटाने वेगळे स्थान निर्माण केले. याच चित्रपटाचा आदर्श घेवून वाई तालुक्यातील वेळे गावात पिंजरा कला केंद्र उभारण्यात आले. या माध्यमातून लोककलावंतांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
पिंजरा चित्रपटाने रसिक प्रेक्षकांना एका विशिष्ट उंचीवर नेऊन इतिहास तयार केला होता. यातील संध्या यांनी साकारलेली चंपा व डॉ. श्रीराम लागू यांनी साकारलेली गुरुजीची भूमिका आजही अजरामर आहे. आज वयाच्या सत्तरच्या पुढे असलेली पिढी संध्या आणि पिंजरा म्हटले की चवीने बोलू लागतात. यातील कला आणि कलावंतांचे नात व महत्व याचे आदर्श या चित्रपटामुळे जनसामान्यांपुढे आले.
पिंजरा चित्रपट आणि वाई तालुक्यातील रसिक प्रेक्षक यांचे एक वेगळे ऋणानुबंध तयार झाले. वेळे येथे दिवंगत विजयराव यादव यांनी कला केंद्र उभारण्याची सुरुवात केली. तेव्हा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या दिवंगत यमुनाबाई वाईकर, पद्मश्री शाहीर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यादव यांनी कला केंद्रास पिंजरा हे नाव दिले. याच केंद्रातून उपाशी पोटी राहणारा लोककलावंत जगवला अन् वाचवला. अगदी जेष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या सुचनेनुसार डोलकी व पेटी वादक यांना जपण्यासाठी प्रयत्न केले.
पिंजरा गाजला वाजला व लक्षातही राहिला. परंतु, त्या संध्याच्या जाण्याने वेळे च्या पिंजरा ने ही श्रद्धांजली अर्पण केली. दिवसभर वाजणारी डोलकी व नाचणारी पाऊले निशब्द झाली. हा शोक व्यक्त करण्यासाठी पिंजरा व संध्या यांना सलाम करणारा कार्यक्रम स्मृती जपणारा ठरेल, असा निर्धार करण्यात आला.