विठ्ठल चव्हाण
ढेबेवाडी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वैभवशाली दिवस आता केवळ इतिहास बनले आहेत. गाव तेथे एसटी सुरू होऊन 77 वर्षांचा काळ लोटल्यानंतर आता गावोगावच्या बस थांब्यावर असणारी प्रवासी निवारा शेड (पिकपशेड) बेवारस होऊन अक्षरशः उद्धवस्त झाली आहेत. वर्षांनुवर्ष दुरुस्तीची प्रतीक्षा आणि महामंडळासह अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे निवारा शेड नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मागील काही वर्षांत तर महामंडळच दारिद्य्ररेषेखाली गेले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो.
कराड - ढेबेवाडी हा सुमारे 28 किलोमीटरचा मार्ग आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास सर्वाधिक महसूल मिळवून देणार्या मार्गापैकी एक मार्ग अशी या मार्गाची ओळख आहे. या मार्गावर प्रत्येक गावालगत प्रवाशांसाठी निवारा शेड उभारण्यात आली होती. प्रवाशांना केवळ एसटी नव्हे, तर खाद्य पदार्थ तसेच अन्य सुविधाही यामुळे उपलब्ध होत होत्या. ढेबेवाडी मार्गावरील चचेगाव, विंग हॉटेल, कोळे, कोळेवाडी, मानेगाव, तळमावले, गुढे, मालदन अशा 8 ठिकाणी पिकपशेड बांधण्यात आल्या होत्या. पूर्वी 90 टक्क्यांहून अधिक लोक एसटीने प्रवास करत होते आणि आजही ढेबेवाडी विभागात एसटी प्रवासाला प्राधान्य दिले जाते. मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कारभारामुळे वडाप व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे. आज जी पिकपशेडस् तग धरून आहेत, त्यापैकी 95 टक्के शोधावी लागतील आणि सापडली तर त्याचा वापर होतच नाही, हे दिसून येईल.
चचेगाव, कोळे, घारेवाडी, कोळेवाडी, मानेगाव ही पिकपशेडस् जागेसह गायब आहेत. विंग, तळमावले, गुढे, मालदन इथली पिकपशेड अस्तित्वात असली तरी ती शेवटच्या घटका मोजत आहेत. या पिकपअप शेडमध्ये नेमके कोण बसते ? याची दाद लागत नाही. मात्र तिथे बसणारे प्रवास नक्कीच करत नाहीत. विंगच्या पिकपअप शेडमध्ये दुकानच थाटण्यात आले आहे. पण ते कधीच चालू नसते. तसेच अर्ध्या शेडमध्ये एक दुकान असून ते बहुधा भाड्याने दिले असावे, पण ते कधीच चालू नसते. कोळेवाडी येथे पिकपशेडच नाही. ते गायब झाले असून जागा कुठे आहे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तळमावले या मध्यवर्ती ठिकाणी पिकपशेड प्रशस्त होते. मात्र ते गायब होऊन तिथे छोटे शेड बांधलेले आहे. पण कुणीतरी अनधिकृतरित्या जागेसह गायब केल्याची शंका आहे. गुढे येथे केंद्रीय खनिज महामंडळाचे संचालक भरत पाटील यांनी माजी केद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या माध्यमातून निधी आणून पिकपशेड बांधले होते. पण रस्ता रूंदीकरणानंतर ते गायब झाले होते. दोन वर्षानंतर गुढे येथील पी. के.पाटील यांनी पुन्हा तिथे नविन पिकपशेड बांधले होते. पण दोनच महिन्यापूर्वी त्या पिकपशेडमध्ये भरधाव वेगाने रिक्षा घुसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. त्या अपघातात भिंत ढासळून शेड उध्वस्त झाले आहे.
पण ते दुरूस्त करण्याची तसदी आजवर कुणीच घेतल्याचे दिसत नाही. मालदन बस थांब्यावर सतत गर्दी दिसत असते. मात्र येथील पिकपशेडमध्ये कोणीतरी जनावरांचा चारा व टाकाऊ वस्तू ठेवल्या असल्याने लोकांना एसटी प्रतिक्षा करत रस्त्यावरच उभे रहावे लागत आहे. पिकपअप शेडचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होताना दिसतो. तसेच दुरुस्तीकडे महामंडळाकडून कानाडोळा केला जात आहे. काही ठिकाणी पिकपशेडसह जागाच गायब आहे. त्यामुळे कोणी अतिक्रमण केली आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कराड-ढेबेवाडी मार्गाच्या चौपदरीकरणात हजारो लहान - मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र नवीन झाडे लावण्यात आलेली नाहीत. रस्त्यात येणार्या घरे, शेडस्, शेती यांची किंमत त्यावेळी दिली गेली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पिकपअप शेडची भरपाई मिळाली का? मिळाली असेल तर ती किती होती? याची माहिती प्रसिद्ध करण्याची मागणी होत आहे.