फार्मासिस्ट नोंदणीला ब्रेक; विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला File Photo
सातारा

फार्मासिस्ट नोंदणीला ब्रेक; विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

D-Pharmacy | डी फार्मसी एक्झिट परीक्षा विलंबाचा फटका : नोकरी व व्यावसायही अंधातरीच

पुढारी वृत्तसेवा

सातारा : औषध निर्माण क्षेत्रातील शिखर संस्था फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पी.सी.आय, नवी दिल्ली) व त्यास अनुसरून इतर संस्थेमधील समन्वयाच्या अभावामुळे देशातील व राज्यातील औषध निर्माण शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांच्या फार्मासिस्ट अधिकृत नोंदणीला ब्रेक लागला आहे. डी फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक केलेल्या ‘एक्झिट’ परीक्षेस झालेला विलंब त्याला कारणीभूत ठरला आहे. परिणामी डी फार्म विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून या विद्यार्थ्यांच्या नोकरी व व्यावसायाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

औषध निर्माण शास्त्र शाखेतील पदविका (डी. फार्मसी) अभ्यासक्रमावर आधारित ‘एक्झिट एक्झाम’ ही राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेण्यात येते. शैक्षणिक वर्ष सन 2023- 24 पासून देशातील सर्व औषध निर्माण शास्त्र पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली (पी.सी.आय) या शिखर संस्थेने विद्यार्थ्यांना ही ‘एक्झिट एक्झाम’ देणे बंधनकारक केले आहे. औषध निर्माण शास्त्र शाखेतील दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणातून तज्ञ, कुशल व कौशल्ये विकसित फार्मासिस्ट घडवणे व बदलत्या काळानुसार सक्षम रुग्णसेवा देऊन औषध निर्माण शाखेचा दर्जा उंचावणे, या हेतूने डी फार्मसी एक्झिट एक्झाम घेण्याचा धोरणात्मक निर्णय फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्लीने (पी.सी.आय) घेतला.

ही परीक्षा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (एन. बी. ई. एम. एस. नवी दिल्ली) यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे. वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार आहे. त्यानुसार यंदा दि. 3, 4 व 5 ऑक्टोबर 2024 रोजी तीन दिवस तीन पेपर अशा वेळापत्रकानुसार ती घेण्यात येणार होती. परंतु ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना कळवण्यात आले. या परीक्षेला विलंब होत असल्याने डी. फार्मसी परीक्षा उत्तीर्ण होऊनही विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून फार्मसी ऑफ इंडियाकडे अधिकृत नोंदणी करता येत नाही. परिणामी औषध निर्माण शास्त्र शाखेची पदवी आहे पण नोकरी अथवा व्यवसाय सुरू करता येत नाही, अशी कोंडी निर्माण झाली आहे.

देशातील जवळपास 2892 महाविद्यालयातून जवळपास 1,72,920 विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेतात. यामधील सरासरी एक लाख विद्यार्थी उत्तीर्ण होतात. उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांची एक्झिट एक्झाम वेळेत न झाल्याने विविध समस्या विद्यार्थ्यांपुढे व त्यांच्या पालकांपुढे निर्माण झाल्याचे चित्र आहे. एक्झिट एक्झाम ही परीक्षा कधी व कशी होणार? याबाबत अद्याप कोणताही निर्णय अथवा आदेश संबंधित यंत्रणेकडून महाविद्यालयांना प्राप्त न झाल्याने या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजून किती काळ वाट पहावी लागणार या प्रतिक्षेत विद्यार्थी चिंतातूर आहेत. पाच महिन्यांपूर्वी उत्तीर्ण झालेल्या डी फार्मसी च्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे.

शैक्षणिक वर्ष सन 2023- 24 मध्ये फार्मसी उत्तीर्ण झालेल्या देशभरातील असंख्य विद्यार्थ्यांनी भविष्यातील उज्वल करिअरचे स्वप्न उराशी ठेवून तीन महिन्याचे ट्रेनिंग पूर्ण केलेले असते यानंतरच त्यांना फार्मासिट म्हणून आपापल्या राज्यातील फार्मसी कौन्सिलिंग कडे नोंदणीसाठी अर्ज करता येतो उदा. महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलिंग मुंबई (एम .एस. पी. सी) यांच्याकडे राज्यातील उत्तीर्ण झालेले फार्मासिस्ट नोंदणी करतात अधिकृत नोंदणी झाल्यावरच त्याचे प्रमाणपत्रच्या आधारे नोकरी अथवा व्यवसाय सुरू करता येतो.

देशातील असंख्य विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्यावर नोंदणी होईल, या आशेवर मेडिकल शॉपसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. कुणी नोकरीसाठीही पाठपुरावा सुरु केला आहे. मात्र केवळ ‘एक्झिट एक्झाम’ च्या विलंबामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. याची नोंद संबंधित यंत्रणेने त्वरित घ्यावी. या विद्यार्थ्यांच्या यशस्वी करिअरसाठी सकारात्मक व तातडीने निर्णय घेवून ही परिक्षा तातडीने घ्यावी.
श्रीरंग काटेकर जनसंपर्क अधिकारी, गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब, सातारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT