फलटण : बहिणीशी चॅटिंग करतो म्हणून 18 वर्षीय युवकाचा चौघांनी मिळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील ढवळपाटी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
सोमनाथ संदीप जाधव (वय 18, रा. मिऱ्याचीवाडी, ता. फलटण) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आदित्य विजय शिंदे व नृसिंह शिंदे (दोघेही रा. ढवळ, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत संदीप उमाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमनाथ हा एका मुलीशी मोबाईलवरून संपर्कात होता. याच कारणावरून संबंधित मुलीच्या नातेवाईकांना राग होता. दि. 10 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास सोमनाथ याला फोन करून ढवळपाटी परिसरात बोलावण्यात आले. यानंतर रात्री सुमारे 1.15 वाजण्याच्या सुमारास सोमनाथच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांना फोन आला. फोन करणाऱ्याचा आवाज अनोळखी होता. सोमनाथच्या वडिलांनी तो अंगणात झोपल्याचे सांगितले. तो अंगणात आहे का बघा? मी फोन चालू ठेवतो असे समोरच्या व्यक्तीने सांगितले. वडिलांनी बाहेर येऊन पाहिले तर सोमनाथ तेथे नव्हता. तुमचा मुलगा ढवळपाटी येथे आहे, तुम्ही लगेच या. सोमनाथचे वडील ढवळपाटी येथे गेले. तेथे त्यांना सोमनाथ मिळून आला नाही. सोमनाथच्या मोबाईलवर फोन लावल्यानंतर अनोळखी व्यक्तीने मिऱ्याचीवाडी कमानी जवळ या, असे सांगितले.
त्या ठिकाणी गेल्यानंतर लाल रंगाच्या कारमधून ड्रायव्हर सीट वरून एक व मागील डाव्या बाजूच्या दरवाजातून दुसरा अनोळखी व्यक्ती व पुढच्या सीट वरून सोमनाथसह तिघेजण खाली उतरले. मुलाला काय झाले असे विचारले तर तो काहीच बोलला नाही. गाडीतील ते दोघेजण म्हणाले, ‘तुमचा मुलगा आमच्या बहिणीशी चॅटिंग करतोय. आम्ही त्याला मारहाण केली आहे, आम्ही त्याला जिवंत ठेवणार नाही.’ मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर मोटारसायकल वरुन दोघेजण आले. या चौघांनी मिळून लाथा, बुक्क्यांनी, तोंडावर, छातीवर, पोटावर मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी सोमनाथ इकडेतिकडे पळू लागला. त्या चौघांनी पाठलाग करून ढवळपाटीवरील व्यापारी गाळ्यांच्या मागील पटांगणात मारहाण करून मिऱ्याचीवाडी कमानीजवळ उचलून आपटले.
दरम्यान, मी मदतीसाठी भावाला बोलावले तो तेथे पोहोचताच कार व गाडीवरून चौघे पसार झाले. मारहाणीत सोमनाथ बेशुद्ध पडला. त्याला घरी नेऊन चार चाकीतून फलटण येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बारामती येथे नेण्यास सांगितले. परिस्थिती नसल्याने तो शुद्धीवर येईल, असे समजून त्याला घरी नेण्यात आले; मात्र त्याची हालचाल पूर्ण थांडावल्याने पुन्हा त्याला दवाखान्यात नेण्यात आले. फलटण जिल्हा उपरुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
याप्रकरणी आदित्य विजय शिंदे, ओम लोखंडे, विट्या लोखंडे व पिंटू लोखंडे (सर्व रा. ढवळ, ता. फलटण) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान नृसिंह शिंदे याचाही सहभाग निष्पन्न झाल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले. पो. नि. संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.