फलटणला उन्हाचा चटका वाढला  
सातारा

Satara News : फलटणला उन्हाचा चटका वाढला

तालुका त्रस्त : नागरिकांची पावले वळू लागली रसवंती गृहांकडे

पुढारी वृत्तसेवा

पोपट मिंड

फलटण : फेब्रुवारीचा पंधरवडा उलटताच फलटण तालुक्यात उन्हाचा चटका वाढू लागला असून उन्हाळ्याची चाहूल देणारी रसवंती गृहांची लगबग आता ठिकठिकाणी दिसू लागली आहे. सकाळपासूनच कडक ऊन पडत असल्याने कोरडा घसा ओला करण्यासाठी नागरिकांची पावले रसवंती गृहांकडे वळू लागली आहेत.

फलटण-पुणे, फलटण-सातारा, पंढरपूर, बारामती, दहिवडी या मार्गांवरील महामार्गांसह शहरातील चौकाचौकात, गल्ल्याबोळात आणि वर्दळीच्या ठिकाणी रसवंती गृहे उभारली जात आहेत. काही ठिकाणी पारंपरिक बैलगाड्यांच्या साहाय्याने चालणारे घाणे आजही प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा लयबद्ध नाद ऐकत थंडगार उसाच्या रसाचा आस्वाद घेण्याचा अनुभव अनेक जण घेत आहेत. तर काही ठिकाणी इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने रस काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाढत्या तापमानामुळे शीतपेयांच्या बाटल्यांपेक्षा निसर्गीक उसाच्या रसाला नागरिक अधिक पसंती देत आहेत. आल्याचा तिखटपणा, लिंबाचा आंबटपणा आणि पुदिन्याचा सुगंध यामुळे रसाला विशेष चव येत असून तो शरीराला थंडावा देण्यासोबतच ऊर्जा देतो. ‌‘पंधरा-वीस रुपयांच्या शीतपेयांपेक्षा दहा-पंधरा रुपयांचा ताजा रस केव्हाही चांगला,‌’ अशी प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. गत काही दिवसांत तापमानाचा पारा 32 ते 35 अंशांच्या पुढे गेल्याने रसवंती चालकांच्या व्यवसायाला चांगलीच चालना मिळाली आहे. पुढील काळात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने रसवंती गृहांवरील गर्दीत आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT