फलटण : पिंप्रद, (ता. फलटण) येथे लग्नासाठी दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नीचा भीषण अपघातात मृत्यू झाला. फलटण ते पंढरपूर पालखी महामार्गावर ट्रकने दुचाकीला धडक दिली. गजानन रामचंद्र जाधव व त्यांच्या पत्नी सिंधुताई गजानन जाधव (रा. राजुरी चौफुला, ता. फलटण) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. दुर्घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक केली. पालखी महामार्गावर दोन दिवसांत तिघांचा मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर गंभीर जाधव दाम्पत्याला तातडीने फलटण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच बरड दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी अमोल चांगण घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
याच मार्गावर सोमवारी दुचाकीने ट्रकला धडक दिल्याने विडणीतील एकाचा मृत्यू झाला होता. सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे पंढरपूर-फलटण मार्ग अपघातप्रवण क्षेत्र बनत आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून होत आहे. जाधव दाम्पत्याच्या मागे दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. राजुरी चौफुला येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार झाले.