साखरवाडी : फलटण तालुक्यात अवैध दारू विक्रीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगत आहे. गावठी दारु व ताडी विक्रीचे अड्डे उघडपणे सुरू असून काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विक्री होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिकांचा आरोप आहे की, उत्पादन शुल्क विभागाची गाडी महिन्यातून केवळ एकदाच येते आणि कारवाईपेक्षा इतर गोष्टींवरच भर दिला जातो. काही नागरिकांनी तर थेट हप्ते घेतल्याचा आरोप करत संबंधित यंत्रणेच्या भूमिकेवर गंभीर शंका व्यक्त केली आहे. मात्र या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
तालुक्यातील ग्रामीण भागात गावठी दारू सहज उपलब्ध होत असल्याचे सांगितले जाते. यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. तसेच अवैध दारूमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका कायम आहे. राज्यातील विविध भागांत पूर्वी गावठी दारूमुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असल्याने प्रशासनाने वेळीच कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक पोलीस प्रशासन आणि महसूल यंत्रणा यांची संयुक्त कारवाई अपेक्षित असताना प्रत्यक्षात कारवाया अपुऱ्या प्रमाणात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, नागरिकांकडून होणाऱ्या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. प्रशासनाने या बाबत खुलासा करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी होत आहे.
लोकप्रतिनिधींची भूमिका काय?
तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी या विषयावर ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या मते, अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे. फलटण तालुक्यात अवैध दारू विक्रीचा प्रश्न गंभीर बनत असल्याची चर्चा असून, हप्ते घेतल्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे. प्रशासनाने तातडीने संयुक्त मोहीम राबवून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.