Phaltan ZP Elections: राजे व खासदार गटातच होणार निकराचा सामना Pudhari
सातारा

Phaltan ZP Elections: राजे व खासदार गटातच होणार निकराचा सामना

फलटणमध्ये दोन्ही निंबाळकरांची अस्तित्व व वर्चस्वासाठी राजकीय लढाई

पुढारी वृत्तसेवा
पोपट मिंड

फलटण : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्याने फलटण तालुक्यातील राजकीय हालचाली अत्यंत गतिमान झाल्या आहेत. इच्छुकांना आता नेतेमंडळींकडून उमेदवारीच्या सिग्नलची प्रतीक्षा लागून राहिली आहे. जिल्हा परिषदेच्या 8 गटांसाठी व पंचायत समितीच्या 16 गणांसाठी राजे व खासदार गटात निकराचा सामना होणार आहे. तर राजे गटासाठी अस्तित्वाची व खासदार गटासाठी वर्चस्वाची लढाई ठरणार आहे. त्याचबरोबर खासदार गटाला महायुतीतील समविचारी घटक पक्षांना सोबत घेऊन तालुक्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तगडे नियोजन करावे लागणार आहे.

गतवेळी तालुक्यातील जि. प. गट व पंचायत समिती गणांवर विधानसभेचे माजी सभापती आ.रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजे गटाचे निर्विवाद वर्चस्व होते. लोकसभा विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत गेली. आमदारकीची सत्ता विरोधात गेल्यामुळे राजे गटातील अनेक बुरुज ढासळले. याउलट केंद्रात राज्यात सत्तेत असल्याचा लाभ उठवत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तालुक्यात विविध विकासकामांच्या माध्यमातून जनमानसात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.

परिणामी खासदार गटाकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंगचा ओघ वाढतच राहिला. जुन्या सहकाऱ्यांना मान, नवीन आलेल्यांचा सन्मान असा समन्वय साधत खासदार गट व राजे गटाला शह देण्यासाठी रणनीती आखत आहे. सध्या तरी खासदार गट व राष्ट्रवादी कणखरपणे बांधली जात आहे. राजे गटाने शिवसेनेचा मार्ग पत्करल्याने तो गटही सत्तेत सहभागी झाला असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. राजे गटातील संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा गाव पातळीवर प्रचंड जनसंपर्क आहे. गाव पातळीवरील स्थानिक ग्रामपंचायती, सोसायटी यांच्यावर कागदोपत्री निर्विवादपणे आजही राजे गटाचे वर्चस्व पाहायला मिळते. अंतर्गत असलेली गटबाजी थोपवली तर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये निकराचा राजकीय संघर्ष पाहायला मिळेल.

सत्तेच्या चाव्या कोणाकडे जातील हे सांगणे भविष्यवाणी ठरेल. खासदार गट व राजे गट या व्यतिरिक्त तालुक्यामध्ये रासप, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट यांच्या पक्षीय भूमिकेवरही राजकीय समीकरणे बदलू शकतात.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजप यांची तालुक्यात युती घट्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यात 50 टक्के जागांची मागणी केली आहे. ती मागणी मान्य झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्रपणे लढण्याची मानसिकता ठेवून आहे. काहीही करुन 50 टक्के जागा आम्हाला हव्यातच अशी त्यांची मागणी आहे. ती मागणी मान्य झाली नाही तर सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढण्याची रणनीती त्यांची तयार असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युती स्थानिक पातळीवर झाली नाही तर जिल्हा पातळीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गट अशी तालुक्यात युती होण्याचे संकेतही दिले जात आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबरच रयत क्रांती संघटना, रिपब्लिकन पक्ष हे महायुतीचे घटक पक्ष असल्याने त्यांच्या भूमिका ही महत्त्वाच्या आहेत. त्यांना बरोबर घेऊन सत्तेच्या वाट्यात सहभागी करुन एकत्रित निवडणुका लढवल्या जाणार का? हे पहाणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपमध्ये असलेले जुने निष्ठावंत कार्यकर्ते व नवीन प्रवेश केलेले नेते यांच्यामध्ये ताळमेळाचा अभाव व इच्छुकांची भाऊ गर्दी ही डोकेदुखी ठरु शकते. फलटण तालुक्यात रासपाची ताकद असून या पक्षाला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. या पक्षाने स्वतंत्र उमेदवार उभे केल्यास त्याचा फटका कोणाला बसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. याशिवाय मराठा क्रांती मोर्चा चे सदस्य वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका ही निर्णायक ठरु शकतात.

राजे गट शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तालुक्यात तुल्यबळ स्थितीत आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजेच मिनी मंत्रालयाची सत्ता कोणाच्या हाती जाणार यासाठी जोरदार सामना रंगणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार भाजप व राष्ट्रवादी यांची युती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे निवडणूक पूर्व आघाड्यांबाबत अजूनही अनिश्चिततेचे वातावरण आहे. या प्रमुख पक्षासोबतच रासपा, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट हे पक्षही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ताकतीने उतरतील. यामुळे लढत बहुपक्षीय होण्याची शक्यता असून काही गट-गणांमध्ये चुरशीचे त्रिकोणी अथवा चौरंगी सामने पाहायला मिळू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT