फलटण : विधान परिषदेचे माजी सभापती व ज्येष्ठ नेते आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बुद्धिबळाच्या पटाचा फोटो शेअर करत त्यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे आगामी राजकीय घडामोडींबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्टेटसमध्ये “As long as the king stands, the game is alive” असा आशय व्यक्त केला आहे. त्यासोबतच ‘वजीर घोडे गेले. नवीन प्यादी इनकमिंग सुरू झाले आहेत. उलटे निरोप सुरू झाले आहेत. जिथे आपण गेले आहात ती वन वे आहे. परतीची वाट नाही.’ असा मजकूर पोस्ट केला आहे. स्टेटसमधील ‘राजा’, ‘वजीर’, ‘घोडे’ आणि ‘नवीन प्यादी’ या शब्दांमुळे त्यांचा नेमका राजकीय रोख कोणाकडे आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
आगामी काळातील संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या पोस्टचा अर्थ लावला जात असून, राजकीय कार्यकर्त्यांमध्ये विविध तर्क-वितर्क रंगले आहेत. या सूचक स्टेटसबाबत आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या पोस्टमागील नेमका संदेश काय, याबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे.