Phaltan News: फलटणकरांना हवा ‌‘भगिरथ‌’ विचारांचाच नेता Pudhari
सातारा

Phaltan News: फलटणकरांना हवा ‌‘भगिरथ‌’ विचारांचाच नेता

केवळ भाषणं करणारा हवा की जलदृष्टी असणारा भगिरथ विचारांचा नेता हवा याविषयी फलटणकर जनतेमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत

पुढारी वृत्तसेवा

फलटण : केवळ भाषणं करणारा हवा की जलदृष्टी असणारा भगिरथ विचारांचा नेता हवा याविषयी फलटणकर जनतेमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चेमधून भागाचा कायापालट करणारा, कृषि, औद्योगिक विकासाचा पाया रचणाऱ्या रामराजे ना. निंबाळकर यांच्या विचारानेच विकासाचा गाडा पुढे जावू शकतो, असा मतप्रवाह प्रबळ होवू लागला असून तालुक्याला रामराजेंच्या भगिरथ विचारांचीच गरज असल्याचा सूर फलटण तालुक्यामध्ये उमटला आहे.

निवडणुकीच्या काळात विकासाच्या चर्चा सर्वत्र सुरू असतात. रस्ते, योजना, निधी, आकडे-सगळं काही ऐकायला मिळतं. मात्र एक मूलभूत प्रश्न आहे, जो क्वचितच थेट विचारला जातो : ‌‘हे नेतृत्व संकट येण्याआधी विचार करतं का, की संकट आल्यानंतर फक्त भाषण करतं?‌’ या प्रश्नाचं उत्तर एका मुद्द्यावरून स्पष्ट होतं-तो म्हणजे पाणी. कारण पाणी हा विषय निवडणुकीपुरता मर्यादित नसतो; तो पिढ्यान्‌‍ पिढ्यांचा असतो. फलटण-सातारा परिसराचा इतिहास पाहिला, तर ही बाब प्रकर्षाने जाणवते.

फलटण हा प्रदेश निसर्गाने कणखर बनवलेला आहे. पर्जन्यमान मर्यादित, नद्या हंगामी आणि जमीन कोरडी. अशा परिस्थितीत राजकारण म्हणजे केवळ सत्ता नव्हे-ती एक मोठी जबाबदारी असते. कारण येथे घेतलेला चुकीचा निर्णय म्हणजे पुढील पिढ्यांचं आयुष्य धोक्यात घालणं. म्हणूनच खरा ‌‘भागीरथ‌’ तोच, जो आपल्या काळाच्या पुढे जाऊन विचार करतो. फलटणच्या इतिहासात हा विचार कृतीत उतरलेला दिसतो तो फलटण संस्थानचे अधिपती रामराजे ना. निंबाळकर यांच्या कार्यातून. फलटण तालुक्याची जनता जाहीरपणे असे बोलत आहे.

रामराजेंनी पाण्याकडे कधीही केवळ एखादी योजना म्हणून पाहिलं नाही. त्यांच्या दृष्टीने पाणी म्हणजे लोकजीवनाचा आधार होता. पाणी साठवणूक, जलस्रोतांचे संवर्धन, शेतीला आधार देणाऱ्या पायाभूत रचना, हे सगळं त्यांनी प्रसिद्धीसाठी नव्हे, तर सामान्य जनतेच्या हितासाठी उभारलं. आजच्या राजकारणात ‌‘शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म‌’ हा मोठा प्रश्न आहे. निवडणूक पाच वर्षांची असते, पण पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षांचा असतो. जे नेतृत्व पाच वर्षांच्या पुढे पाहू शकत नाही, ते पाण्यासारखा मूलभूत प्रश्न कधीच सोडवू शकत नाही. रामराजे इथेच वेगळे ठरतात. त्यांनी पाणी हा मुद्दा निवडणूक जाहीरनाम्यापुरता मर्यादित न ठेवता, थेट कारभाराच्या केंद्रस्थानी ठेवला.

आज फलटणमध्ये जे सामाजिक स्थैर्य दिसतं-शेती, वस्ती आणि स्थानिक अर्थव्यवस्था-त्यामागे पाण्याचा मजबूत पाया आहे. हा पाया योगायोगाने उभा राहिलेला नाही; तो दूरदृष्टीतून घडवलेला आहे. आज पाणी अनेकदा फक्त घोषणा बनली आहे, पण पूर्वी ती एक संस्कृती होती. फलटणच्या बाबतीत ही जलसंस्कृती रामराजेंनी रुजवली.

निवडणूक म्हणजे फक्त नवीन उमेदवार निवडणं नव्हे; ती वारसा आणि विचार यांची निवड असते. आपल्याला असा नेता हवा आहे का, जो संकट आल्यानंतर उपाय शोधतो? की असा, जो संकट येऊच नये यासाठी आधीच तयारी करतो? रामराजेंची ही दूरदृष्टी फलटणकरांनी प्रत्यक्ष अनुभवली आहे. त्यामुळेच आज इतर तालुक्यांच्या तुलनेत फलटण अनेक बाबतीत सरस ठरतं. आज हवामान बदल, पाणीटंचाई आणि शेतीचं संकट या सगळ्या गोष्टी एकत्र उभ्या राहत आहेत. अशा काळात नेतृत्वाची ओळख भाषणांवरून नव्हे, तर समजुतीवरून ठरते. रामराजेंच्या परंपरेत पाणी म्हणजे सत्ता नव्हती-ती सेवा होती. आणि हीच सेवा भविष्यातील राजकारणाचा पाया ठरू शकते. म्हणूनच त्यांच्या विरोधकांकडूनही त्यांचा उल्लेख ‌‘आधुनिक भागीरथ‌’ असा केला जातो.

कृष्णेचं पाणी या कायम कोरड्या राहिलेल्या भूमीत पोहोचलं आहे, आणि या पाण्याचा फलटणकर आदराने उल्लेख करतात. पूर्वी सर्व पिकं पूर्णपणे पावसावर अवलंबून होती. आज ढोबळकाबडीचं पाणी या भूमीत समृद्धी घेऊन आलं आहे. त्यासोबत उसाचं क्षेत्रही लक्षणीय प्रमाणात वाढलं आहे. परिणामी, मुंबईतील लोखंडी जट्टा आणि कापड बाजारात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची एक नवी पिढी आता या भूमीकडे वळली असून, इथे स्वतःची शेती सुरू करत आहे. ही एक सकारात्मक आणि आशादायी घडामोड आहे. पाण्याचं हेच खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे. आणि या बदलाचं श्रेय नक्कीच रामराजे यांना दिलं पाहिजे.

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्ताने अनेक जण हवेत गप्पा मारतात. मात्र आजच्या तरुण पिढीने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, या दुष्काळी भागात जेव्हा कुणीच नव्हतं, तेव्हा रामराजेंनी जनतेला पाण्याच्या दुर्भिक्ष्यातून बाहेर काढलं. म्हणूनच त्यांचा उल्लेख आजही ‌‘आधुनिक भागीरथ‌’ म्हणून केला जातो. फलटण आणि साताऱ्यासमोर प्रश्न एकच आहे, आपल्याला केवळ घोषणा देणारा नेता हवा आहे, की भागीरथ विचारांचा? कारण भागीरथ आठवला जातो तो फक्त गंगा आणल्यासाठी नाही, तर स्वतःच्या काळाच्या पुढे जाऊन विचार केल्यासाठी. फलटणमध्ये हा विचार ज्या परंपरेने जपला, ती परंपरा म्हणजे रामराजेंंची जलदृष्टी.त्यामुळे या जलदृष्टीला फलटणकरांनी स्वीकारायला हवे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT