Phaltan Municipal Council Election Result 2025: रामराजेंचा बालेकिल्ला ढासळला Pudhari Photo
सातारा

Phaltan Municipal Council Election Result 2025: रामराजेंचा बालेकिल्ला ढासळला

समशेरसिंहांनी ‌‘रण‌’ जितले; भाजप-राष्ट्रवादीला 18 तर शिवसेना आघाडीला 9 जागा

पुढारी वृत्तसेवा

फलटण : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षपदासह 18 जागा जिंकल्या. प्रतिस्पर्धी शिवसेना व आघाडीला 9 जागांवरच समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हाती भोपळा लागला आहे.

फलटण नगरपालिकेवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत समशेरसिंह हे फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीतील रणजित ‌‘सिंह‌’ ठरले. या निकालाने फलटण नगरपालिकेची तब्बल 30 वर्षांची राजे गटाची सत्ता उलथून टाकली. विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे ना. निंबाळकर यांचा बालेकिल्ला ढासळला आहे.

फलटण नगरपालिका निवडणूक यंदा कधी नव्हे एवढी प्रतिष्ठेची व रंगतदार ठरली. दोन्ही बाजूंकडून मंत्र्यांचा फौजफाटा प्रचाराच्या रणांगणात उतरवण्यात आला होता. त्यामुळे निकालाबाबत फलटणमध्ये प्रचंड उत्कंठा लागून राहिली होती. रविवारी सकाळी दहा वाजता शासकीय धान्य गोदाम येथे मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या दोन अडीच तासातच निकाल बाहेर आला. जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार व माजी खासदार रणजितसिंह यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी जोरदार मुसंडी मारली. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार व विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा 600 मतांनी पराभव केला. समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांना 16,489 मते मिळाली तर विरोधी उमेदवार शिवसेना पक्षाचे अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांना 15,889 मते मिळाली. 341 जणांनी नोटाला पसंती दिली.

नगरसेवक पदाच्या 27 जागांपैकी 12 जागेवर भाजपने विजय मिळवला. भाजपसोबत आघाडी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाने चार जागा व त्यांनीच पुरस्कृत केलेले दोन अपक्ष अशा 18 जागेवर कब्जा करून फलटण नगरपालिकेवर निर्विवाद बहुमत मिळवले. 30 वर्षांची एक हाती सत्ता असलेल्या राजे गट शिवसेना, काँग्रेस व कृष्णा भीमा आघाडीला 9 जागांवरच समाधान मानावे लागले.

फलटण नगरपालिकेसाठी नगरसेवक म्हणून निवडून आलेले उमेदवार, कंसात त्यांचे पक्ष व मते याप्रमाणे, प्रभाग क्रमांक 1 अ अस्मिता भीमराव लोंढे (अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत-889), 1 ब सोमा गंगाराम जाधव (अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत-1116), प्रभाग 2 अ मीना जीवन काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार-980), 2 ब सुपर्णा सनी अहिवळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार-1466), 3 अ सचिन रमेश अहिवळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार-1265), 3 ब सुलक्षणा जितेंद्र सरगर (भाजप-1334), 4 अ रुपाली सुरज जाधव (शिवसेना-1818), 4 ब अजरुद्दीन ताजुद्दीन शेख (शिवसेना 1858), 5 अ कांचन दत्तराज व्हटकर (भाजप-1857), 5 ब रोहित राजेंद्र नागटिळे (भाजप-1863), 6 अ किरण देवदास राऊत (भाजप-1156), 6 ब मंगलादेवी पृथ्वीराज नाईक-निंबाळकर (भाजप-1350), 7 अ स्वाती राजेंद्र भोसले (भाजप -1153), 7 ब पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे (शिवसेना-1153),

8 अ विशाल उदय तेली (शिवसेना-1535), 8 ब सिद्धाली अनुप शहा (भाजप-1456), 9 अ कविता श्रीराम मदने (कृष्णा भीमा आघाडी -1409), 9 ब पंकज चंद्रकांत पवार (काँग्रेस-1061), 10 अ श्वेता किशोर तारळकर (शिवसेना-1210), 10 ब अमित अशोक भोईटे (भाजप-1605), 11 अ संदीप दौलतराव चोरमले (भाजप-1064), 11 ब प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले (भाजप-1082), 12 अ विकास वसंतराव काकडे (शिवसेना-1523), 12 ब स्मिता संगम शहा (शिवसेना-1374), 13 अ मोहिनी मंगेश हेंद्रे (भाजप-1330), 13 ब रूपाली अमोल सस्ते (भाजप - 1578), 13 क राहुल अशोक निंबाळकर (राष्ट्रवादी अजित पवार गट -1527).

या निकालाने फलटण शहराच्याच नव्हे तर तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे. फलटण नगरपालिकेवर 30 वर्षांपासून एक हाती वर्चस्व असलेल्या आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती. निवडणुकीपूर्वी काही दिवस अगोदर त्यांचे सुपुत्र अनिकेतराजे नाईक-निंबाळकर व संपूर्ण राजे गटाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. सत्तेतील पक्षाची ताकद व राजकीय अनुभव पणाला लावून आ. रामराजे यांनी निकराचे प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सभा घेतल्या. स्वतः आ. रामराजे यांनी प्रत्येक प्रभागांमध्ये कोपरा सभा घेतल्या सर्वस्व पणाला लावूनही त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव तर झालाच.

परंतु नगरपालिकेत ते दोन अंकी नगरसेवकांचा आकडाही गाठू शकले नाहीत. ऐनवेळी तीन-चार प्रभागातील मातब्बर उमेदवारांनी पक्षांतर केल्याने त्या-त्या प्रभागात मातब्बर उमेदवार देता आले नाहीत. त्यामुळे त्याचा मोठा फटका अनिकेतराजेंना बसल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून आले. आपल्या हक्काच्या एक, दोन, तीन वार्ड व तेरा वॉर्डमध्ये त्यांची पीछेहाट झाली. याउलट रणजितसिंह यांनी आखलेले डावपेच कमालीचे यशस्वी झाले. त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी खंडण केले. तसेच फलटणच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची जबरदस्त पाठराखण असल्याचे जनतेच्या ध्यानी आले.

फलटणच्या विकासासाठी रणजितसिंह यांनी आणलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या निधीमुळे विकासाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी नगरपालिकेची सत्ता आवश्यक असल्याचे रणजितसिंह यांनी वारंवार आवाहन केले होते. ते भाजप उमेदवारांसाठी फलदायी ठरले. रणजितसिंहांचे मित्र ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब सोळस्कर, शिवरूपराजे खर्डेकर यांनी घेतलेली मेहनत फळाला आली. तळागाळातील मतदारांच्यापर्यंत थेट संपर्क साधण्याचे समशेरसिंह यांचे डावपेच यशस्वी झाले. त्यामुळे त्यांचा तब्बल 600 मतांनी तर नगरसेवक पदाचे एकत्रित 18 उमेदवार निवडून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT