फलटणला हमीभाव केंद्रावर खरेदी बंद : हजारो क्विंटल मका अंगणात पडून 
सातारा

Sangli News : मुदत संपली, कोटा संपला; मका अडकला!

फलटणला हमीभाव केंद्रावर खरेदी बंद : हजारो क्विंटल मका अंगणात पडून

पुढारी वृत्तसेवा

पोपट मिंड

फलटण : शासनाने मोठ्या गाजावाजात सुरू केलेले मका हमीभाव खरेदी केंद्र आता मुदत संपल्याने बंद झाले असून फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अंगणात हजारो क्विंटल मका अक्षरशः पडून आहे. ऑनलाईन नोंदणी बंद खरेदी ठप्प आणि शेतकरी हवालदिल, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात मका उत्पादन झाल्याने शासनाने विविध ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केली होती. त्यानुसार फलटण तालुक्यात फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती यांना खरेदीस मान्यता देण्यात आली. शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये प्रक्रिया सुरू झाली; नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. नोंदणी केल्यानंतर मेसेज आल्यावरच मका स्वीकारला जात होता. नियमाप्रमाणे खरेदी सुरू झाली आणि शासनाच्या कोट्यानुसार सुमारे 3 हजार क्विंटल मका प्रत्यक्ष खरेदी करण्यात आला. साठवणुकीसाठी गोडाऊन अपुरे पडल्याने नव्याने व्यवस्था करण्यात आली. मात्र, दिलेला कोटा संपताच खरेदीला ब्रेक लागला. धक्कादायक बाब म्हणजे ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा सुमारे 3 हजार क्विंटल मका अद्याप प्रलंबित आहे. नोंदणी झालेल्यांचीही खरेदी थांबल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ‌‘नोंदणी केली, मेसेजची वाट पाहिली; आता खरेदीच बंद तर आम्ही करायचे काय?‌’ असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

दरम्यान, 31 जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांकडे अद्याप 4 ते 5 हजार क्विंटल मका नोंदणीशिवाय शिल्लक असल्याचा अंदाज आहे. बाजारभाव घसरलेले असताना हमीभावाशिवाय पर्याय नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी सांगितले की, ऑनलाईन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यासाठी जिल्हास्तरावरून शासनाकडे कोटा वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. सात-आठ दिवसांत निर्णय होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकूनच राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT