फलटण : फलटण शहरातील जिंती नाका परिसरात मंगळवारी सायंकाळी कोयता गँगच्या धर्तीवर दहशत माजवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. केस कापण्याच्या दुकानात घुसून हप्त्याची मागणी करत मारहाण व तोडफोड केल्याप्रकरणी अभिजित जाधव याच्यासह एका अनोळखी साथीदाराविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
अभिजित जाधव (वय 22, रा. मलटण, ता. फलटण, जि. सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. जिंती नाका परिसरातील ‘किंग युनिसेक्स पार्लर’ येथे मंगळवारी (ता. 19) सायंकाळी पाचच्या सुमारास दोन इसम मोटारसायकलवरून आले. दुकानात घुसताच त्यांनी शिवीगाळ सुरू केली. त्यातील एकाने कमरेतून सुमारे दोन फुटांचे धारदार लोखंडी हत्यार बाहेर काढून स्वतःला ‘अभि भाई’ म्हणून ओळख करून दिली. तसेच ‘दुकान चालवायचे असेल तर दरमहा दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अन्यथा खल्लास करीन,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर संशयितांनी दुकानातील कामगारांना मारहाण करत साहित्याची तोडफोड केली. या हल्ल्यात मोहम्मद फरमान मोहम्मद नफीस मलिक (मूळ रा. गोवंडी, मुंबई) व अजिम अहमद नसीम अहमद मलिक (मूळ रा. बिजनौर, उत्तर प्रदेश) हे दोघे जखमी झाले. संशयितांनी लोखंडी कड्याने त्यांच्या चेहऱ्यावर व डोळ्याजवळ मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर संशयितांनी दुकानाबाहेर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली आणि मोटारसायकलवरून पसार झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि नितीन शिंदे करत आहेत.