साखरवाडी : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित निलंबित फौजदार गोपाळ बदने आणि त्याचा साथीदार प्रशांत बनकर यांना गुरुवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, गोपाळ बदने याच्याकडून तीन पेन ड्राईव्ह आणि मोबाईल, तर प्रशांत बनकर याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला.
या दोन्ही संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी विविध इलेक्ट्रॉनिक पुरावे, मोबाईल कॉल डिटेल्स तसेच घटनास्थळाशी संबंधित तांत्रिक माहिती गोळा केली आहे. यात संशयित गोपाळ बदने याच्याकडून तीन पेन ड्राईव्ह आणि मोबाईल, तर प्रशांत बनकर याच्याकडून लॅपटॉप व मोबाईल जप्त केले. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील माहितीची पडताळणी करून घटनेमागील नेमके कारण व तांत्रिक पुरावे मिळवण्याच्या दृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत.
मयत डॉक्टर मुंडे यांच्या हातावर मिळालेले हस्ताक्षर त्यांचे नसले तरी या प्रकरणावर हस्ताक्षर तज्ञ अहवाल देणार आहेत. तोपर्यंत अधिक तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. दरम्यान, आरोपी पीएसआय बदनेच्या वकिलांनी युक्तीवाद करताना सुसाईड नोटमधील अक्षर हे डॉ. संपदा मुंडे यांचे नाही असं त्यांचे नातेवाईक म्हणत आहेत. मग यांना कोणत्या आधारावर अटक केली, असा मुद्दा उपस्थित केला.
फलटणमधील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात गुरुवारी सरकारी वकील क्षमा बांदल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी निलंबित फौजदार गोपाळ बदने चौकशीदरम्यान, पोलिसांना सहकार्य करत नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. युक्तिवाद करताना ते म्हणाले, गोपाळ बदनेच्या घराची झडती घेतली असता तीन पेन ड्राईव्ह जप्त केले. त्याच्या मोबाईलमधील डिजिटल पुराव्याबाबतची चौकशी बाकी आहे.