शिकार करण्यास हटकल्याने एकाचा खून Pudhari File Photo
सातारा

Phaltan Murder Case : शिकार करण्यास हटकल्याने एकाचा खून

सस्तेवाडीतील घटना : संशयितांकडून अपघाताचा बनाव; दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

फलटण : सस्तेवाडी, ता. फलटण येथील लोंढेवस्तीनजीक फलटणरोडवर शिकार करण्यास हटकल्याच्या कारनावरून दोघांनी चिडून जाऊन एकाचा खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील संशयित अपघाताचा बनाव करून परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच फाटण पोलिसांनी त्यांना अवघ्या चार तासांत जेरबंद केले. संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असताना न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

रोहन कैलास पवार (वय 20, रा. सोमवार पेठ, फलटण) व गणेश शंकर जाधव (वय 22, सध्या राहणार सोमवार पेठ, फलटण, मूळ राहणार कलिना, मुंबई) असे अटक केलेल्या संशयतांची नावे आहेत.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सस्तेवाडी येथील गणेश बाळू मदने (वय 40) हे अपघातात जखमी होऊन मृत झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथून प्राप्त झाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान घटनास्थळी रक्ताचे थारोळे आढळून आले. तसेच मृताची दुचाकी साईड स्टँडवर सुस्थितीत उभी असून, तिच्या स्विचला चावी असल्याचे निदर्शनास आले. या विसंगतीमुळे पोलिसांचा संशय बळावला. मृताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, काही वेळापूर्वी शेतात ससे पकडण्यासाठी आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींशी गणेश मदने यांचा वाद झाल्याची माहिती समोर आली. मध्यरात्री निर्जनस्थळी ही घटना घडल्याने तांत्रिक तपासास मर्यादा होत्या. तरीही गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. अवघ्या चार तासांत रोहन पवार व गणेश जाधव या दोघांना अटक करण्यात आले. दोघेही परराज्यात पसार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. तपास पोलिस निरीक्षक संदीप जगताप करत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सपोनि शिवाजी जायपत्रे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे उपनिरीक्षक दिपक पवार, उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील, ज्योती चव्हाण, पोलिस कर्मचारी अमोल जगदाळे, वैभव सूर्यवंशी, महादेव पिसे, कल्पेश काशिद, अमोल देशमुख व तुषार नलवडे यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT