स. रा. मोहिते
वाखरी : घड्याळात रात्रीचे 10 वाजले होते. फलटणमधील बिरदेवनगर परिसर नेहमीप्रमाणे शांत होता. पण अचानक एका व्हॉट्सॲप मेसेजने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली. एका मागोमाग एक फोन वाजू लागले आणि बघता बघता संपूर्ण शहरात एकच चर्चा सुरु झाली, बिरदेवनगरमध्ये बिबट्या आलाय. त्यामुळे अक्षरश: थरकाप उडाला. मात्र, त्या फोटोमागचे सत्य समोर आले अन् हा निव्वळ बनाव असल्याचे स्पष्ट झाले.
सोशल मीडियावर एक फोटो वाऱ्यासारखा पसरला. बिरदेवनगरमधील कुणाल काकडे यांच्या घरासमोर एक धिप्पाड बिबट्या उभा असल्याचं त्या फोटोत स्पष्ट दिसत होतं. काही क्षणांतच परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं. नागरिकांनी भीतीने दरवाजे, खिडक्या लावून घेतल्या, तर काही धाडसी तरुणांनी कुणाल काकडे यांच्या घराकडे धाव घेतली. घटनेचं गांभीर्य ओळखून वन विभागाची गाडी सायरन वाजवत तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. वनरक्षक हातात बॅटरी आणि जाळी घेऊन सज्ज होते. प्रत्येक कोपरा शोधला जात होता, पण... बिबट्या कुठेच दिसत नव्हता. वन विभागाने जेव्हा त्या व्हायरल फोटोची बारकाईने तपासणी केली, तेव्हा अधिकारीही चक्रावून गेले. जो बिबट्या फोटोत इतका जिवंत वाटत होता, तो प्रत्यक्षात तिथे कधी आलाच नव्हता. तांत्रिक तपासाअंती एक संतापजनक सत्य समोर आलं तो फोटो खरा नसून एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आला होता. कुणीतरी खोडसाळपणा करुन तंत्रज्ञानाचा वापर करत हुबेहूब बिबट्या कुणाल काकडे यांच्या घरासमोर उभा केला होता. ज्या बिबट्याला बघून लोकांच्या काळजाचा ठोका चुकला होता, तो केवळ एका सॉफ्टवेअरची किमया निघाली. हा प्रकार समोर येताच बिरदेवनगरमधील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ अफवा पसरवण्यासाठी आणि भीती निर्माण करण्यासाठी अशा तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. तंत्रज्ञान सोयीसाठी आहे, भीती घालण्यासाठी नाही. अशा अफवा पसरवणाऱ्यांना अद्दल घडलीच पाहिजे, अशी भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केली आहे.