सातारा : फलटणच्या महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात आरोपी पोलिस अधिकारी असल्याने तपासासाठी त्रयस्थ आणि स्वतंत्र अधिकाऱ्याची समिती गठित करावी. पोलिस यंत्रणेशिवाय स्वतंत्र यंत्रणेकडे या गुन्ह्याचा तपास व्हावा, अशी मागणी आपण उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे फौजदारी याचिकेद्वारे केली असल्याची माहिती लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक ॲड. वर्षा देशपांडे यांनी दिली.
ॲड. देशपांडे म्हणाल्या, या गुन्ह्यात आरोपी पोलिस अधिकारी असल्याने पोलिस वगळता स्वतंत्र आणि त्रयस्थ अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली चौकशी समितीने या गुन्ह्याचा तपास करावा. मृत व्यक्ती अथवा कुटुंबीयांची ओळख उघड होऊ नये याची काळजी घेतली जावी. यापूर्वी काही प्रसिद्धी माध्यमे व पोलिसांकडून अशा पद्धतीचे वर्तन झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, या तीन मागण्या कोल्हापूर खंडपीठाकडे केल्या आहेत. तसेच फलटणच्या डॉक्टर युवतीची आत्महत्या कथित आहे. या संदर्भात डॉक्टर युवतीचे बंधू तसेच बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या सिंधू वरकटे ठोंबरे व मी स्वत: अशा तिघांनी मिळून फौजदारी याचिका उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठांसमोर दाखल केली आहे.
नुकतीच त्याची सुनावणी झाली असून त्यामध्ये संबंधित युवतीचा फोटो, कुटुंब किंवा नातेवाईकांचे फोटो कोणत्याही प्रसिद्धी माध्यमांमध्ये आले असतील तर संबंधितांना तातडीने नोटीस देऊन ते काढावेत, असे सरकारी वकीलांना कोर्टाने सूचना केली आहे. याचिका कर्त्यांच्यावतीने ॲड. गार्गी वारुंजीकर व ॲड. सोनाली चव्हाण, ॲड. नेहा देशपांडे या केसचे काम पाहत आहेत. तसेच न्यायालयासमोर ॲड. उदय वारुंजीकर यांनी युक्तिवाद केल्याची माहिती ॲड. वर्षा देशपांडे यांनी दिली.