Udayanraje Bhosale 
सातारा

Udayanraje Bhosale | लोकांच्या प्रेमामुळेच जिल्हा बँकेत मी बिनविरोध : खा. उदयनराजे भोसले

जिल्हा बँकेत मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. लोकांच्या हितासाठी आवाज उठवत असतो

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी बिनविरोध होण्यामागे जादूबिदू काही नाही. मी काय अल्लादिनचा चिराग घेऊन आलोय का? माझ्यावर लोकांचे प्रेम आहे. मी कुठल्याही राजकारणात पडत नाही. जिल्हा बँकेत मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. लोकांच्या हितासाठी आवाज उठवत असतो, अशी प्रतिक्रिया खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर 'जलमंदिर पॅलेस' या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, राज्यातील शेतकर्‍यांचा उत्कर्ष व्हावा या हेतूने साखर कारखाने, सूतगिरणी अशा सहकारी संस्था स्थापन झाल्या. सहकार चळवळ सर्वाधित महाराष्ट्रात रूजली. मात्र ज्याठिकाणी राजकारण झाले तेथे सहकारी संस्था मोडकळीस आल्या, अवसायनात निघाल्या किंवा डबघाईला आल्या. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवेल्या या सहकार चळवळीचा विसर पडल्याने सहकारी संस्थांमध्ये राजकारण आले आणि सहकाराचा मूळ उद्देश हरवला. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक नावारूपाला आली आहे. विविध स्तरावर बँकेने पारितोषिके मिळवली आहेत. अशा नावरूपाला आलेल्या बँकेत कुठल्याही प्रकारणचे राजकारण आणू नये.

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेला शेतकरी, कष्टकरी हे मतदान करतात. त्यामुळे त्यांचे हित जोपासणे, त्यांचा उत्कर्ष करण्यावर जोर द्यायला हवा. जिल्ह्यासह राज्यात त्यांच्याबद्दल वेगळे मत मांडले तर ते तुमचे हित पाहणार नाहीत. लोक मूर्ख नाहीत. वेगवेगळ्या पदांवर निवडून देताना लोकांच्या अपेक्षा असतात. लोकहिताविरोधात मुद्दा मांडल्यास लोक सोबत कसे राहतील? देशात सहकार चळवळ सर्वाधिक महाराष्ट्रात वाढली. जिल्हा बँकेत हे पॅनेल, ते पॅनेल असणे हा माझा प्रश्न नाही. पण मतदारांनी विचार करणे गरजेचे आहे. माझी भूमिका चुकीची असेल तर जाहीरपणे सांगावे. माझा यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. सर्वसामान्यांची उन्नती, उत्कर्ष व भावी पिढीची प्रगती याच्याशी मी बांधिल आहे. हाच माझा पहिल्यापासूनचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्या झटक्यात बिनविरोध झालात, अशी काय जादू केली? असे विचारले असता मी लोकांच्या प्रेमामुळे बिनविरोध झाल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकांसारख्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, खा. सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेबद्दल विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, दुष्काळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा काही संबंध नाही. निवडणुका पुढे ढकलायच्या की नाही, हा निर्णय शासन घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT