Shambhuraj Desai Pudhari
सातारा

Shambhuraj Desai | पाटण तालुका माझं कुटुंब; संकटात ढाल बनून उभा : ना. शंभूराज देसाई

शिवसेना उमेदारांच्या प्रचारार्थ ढेबेवाडी येथे सांगता सभा

पुढारी वृत्तसेवा

सणबूर : मी या तालुक्याचा मालक नाही, माझी मायबाप जनता मालक आहे! देसाई कुटुंबापूर्वी पाटण तालुका हेच माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबावर, म्हणजेच माझ्या तालुक्यावर कोणतंही संकट आलं तर मी ढाल बनून समोर उभा राहतो. म्हणूनच जनतेचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, अशा ठाम आणि कडक शब्दांत राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

ढेबेवाडी येथील सांगता सभेत ते बोलत होते. ना. देसाई म्हणाले, विधानसभा निवडणुकीत माझ्यावर टीका झाली तेव्हा जनतेनेच उत्तर दिलं आणि पस्तीस हजार मतांनी सत्यजित पाटणकरांचा पराभव केला. अजूनही हाऊस जिरली नसेल, तर या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आणखी मोठ्या मताधिक्याने पराभव करू! या सभेला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जि.प. उमेदवार मृणाल पाटील, पं.स. उमेदवार नितीन काळे आणि संपदा पवार उपस्थित होते. राष्ट्रवादी (श.प.) पक्षाचे प्रदेश सचिव नरेश देसाई यांनीही शिवसेनेच्या उमेदवारांना जाहीर पाठिंब दिला.

ना. देसाई म्हणाले, मोठमोठे नेते पाटणमध्ये येऊन माझ्यावर टीका करतात. पण मी त्यांना सांगतो ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढूया! तुम्ही किती साकव बांधले? किती शाळा खोल्या उभारल्या? किती गावांना पाणीपुरवठा केला? पुनर्वसनाचे प्रश्न सोडवले का? रस्ते केले का? आधी याची उत्तरे द्या. माझ्यावर टीका करताना लक्षात ठेवा माझा कार्यकर्ता एकटाच तुम्हाला पुरून उरेल.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील योजनांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, लाडकी बहीण योजना, महिलांसाठी एस.टी. प्रवास सवलत अशा अनेक लोककल्याणकारी योजना राबवून महायुती सरकारने जनतेचा विश्वास जिंकला आहे. त्यांनी मंद्रुळकोळे गटातील मतदारांना थेट आवाहन केले, जिल्हा परिषदेसाठी मृणाल महेश पाटील आणि पंचायत समितीसाठी नितीन काळे व संपदा पवार यांना मतदान करा. या उमेदवारांना दिलेलं मत म्हणजे शंभूराज देसाईंना दिलेलं मत आहे, हे लक्षात ठेवा! पाटण तालुक्यातील ही निवडणूक आता थेट विकास विरुद्ध टीका अशा मु्‌‍द्यावर रंगल्याचे पहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT