मारूल हवेली : निसरे फाटा (ता. पाटण) ते मारूल हवेली रस्त्याची चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे पडल्याने वाहनधारकांसह प्रवाशीवर्गाचे हाल होत आहेत. खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
मल्हारपेठ आणि मारूल हवेली विभागाला जोडणार्या निसरे विहीर ते मारूल मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. खासगी प्रवाशी वाहतुकीसह एसटी सेवेची वाहतूक देखील होत आहे. मात्र हा रस्ता ठिकठिकाणी उखडला असल्याने वाहनधारक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच अनेक ठिकाणी आडव्या चरी खोदल्या गेल्याने वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
साईडपट्ट्या खचल्या...
निसरे ते मारूल रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून या साईडपट्ट्या भरून घ्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.