गणेशचंद्र पिसाळ
पाटण : पाटण तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका या अनेक ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी ते पंचरंगी होत आहेत. भाजपा राज्य परिषद सदस्य सत्यजितसिंह पाटणकर व शिवसेना शिंदे गटाचे नेते व राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली या प्रमुख तुल्यबळ लढती होणार हे निश्चित आहे. या मान्यवर भाजप, शिवसेना पक्ष व काही ठिकाणी ठाकरेंची सेना उबाठा गट, राष्ट्रीय काँग्रेस, मनसे, राष्ट्रीय समाज पक्ष, बसपासह अपक्ष उमेदवारही आपापले नशीब आजमावत आहेत.
जिल्हा परिषदेच्या 7 सदस्यांसाठी 23 तर पंचायत समितीच्या 14 सदस्यांसाठी 42 अशा एकूण 21 सदस्यांसाठी 65 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत भाजपसह शिवसेना शिंदे गटाचे मान्यवर नेते, पदाधिकाऱ्यांच्या स्वतःसह काही ठिकाणी काही नेत्यांच्या पत्नींच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांना यावेळी तालुकाच नव्हे तर जिल्हा व राज्यासह आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी या सत्ता हस्तगत कराव्या लागणार आहेत. दुसरीकडे सत्यजितसिंह पाटणकर यांना अपवाद वगळता कायमच या सत्ता ताब्यात असल्या तरी यावेळी हीच परंपरा अखंडित ठेवण्यासाठी अस्तित्वाची कडवी झुंज द्यावी लागणार आहे.
यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकात जिल्हा परिषद 7 पैकी 4 तर पंचायत समिती 14 पैकी 8 जागांवर निर्विवाद बहुमत मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पाटणकर गटाची सत्ता प्रस्थापित होती. विरोधी शिवसेना ना. देसाई गटाचे जिल्हा परिषद 3 व पंचायत समिती 6 सदस्य निवडून आले होते. होऊ घातलेल्या या निवडणुकात गोकूळ तर्फ हेळवाक ( कोयना) जि. प. गटात सर्वाधिक सहा उमेदवार रिंगणात असून यात दत्तात्रय कदम (भाजप), संतोष कदम (राष्ट्रीय काँग्रेस), शिवाजी कांबळे (बहुजन समाज पार्टी), अशोक पाटील (शिवसेना शिंदे गट), महेश शेलार (शिवसेना उबाठा), प्रवीण गुरव (अपक्ष)हे उमेदवार रिंगणात आहेत. गोकुळ तर्फ हेळवाक (कोयना) पं. स.साठी चौरंगी लढत असून माजी पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे यांच्या पत्नी वैशाली कांबळे (भाजप), रेखा चव्हाण (शिवसेना उबाठा), पूनम माने (रा. काँग्रेस), मंगल कांबळे (शिवसेना शिंदे गट ) तर येराड पं. स. साठी तिरंगी लढत असून रिया कांबळे (शिवसेना उबाठा), वंदना शिंदे (भाजप), विद्या शिंदे (शिवसेना शिंदे गट) हे उमेदवार रिंगणात आहेत.
तारळे जि. प.साठी दुरंगी लढत असून स्वप्ना पाटील (शिवसेना शिंदे गट), डॉ. क्रांती साळुंखे (भाजप), तारळे पं.स.साठी दुरंगी लढत असून पाटण शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिजित जाधव (भाजप), विकास जाधव (शिवसेना शिंदे गट), मुरूड पं.स.साठी दुरंगी लढत असून रेखा घाडगे (भाजप), सविता पवार (शिवसेना शिंदे गट), रूपाली निकम (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहेत.
म्हावशी जि. प.साठी पंचरंगी लढत असून माजी जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार (भाजप), भरत ढेरे (शिवसेना उबाठा), अरविंद महाबळ (मनसे), संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष भरत साळुंखे (शिवसेना शिंदे गट), महेश तोडकर (अपक्ष), म्हावशी पं.स.साठी तिरंगी लढत असून शंकर घाडगे (भाजप), मंगेश मोळावडे (शिवसेना शिंदे गट), शिवाजी साळुंखे (शिवसेना उबाठा), चाफळ पं.स. साठी दुरंगी लढत असून कमल झोरे (भाजप), राधिका पाटील (शिवसेना शिंदे गट) हे निवडणूक लढवत आहेत. मल्हारपेठ जि.प.साठी दुरंगी लढत असून विजया कुंभार (शिवसेना शिंदे गट), सुजाता कुंभार (भाजप), मल्हारपेठ पं.स. साठी दुरंगी लढत असून सुमन चव्हाण (भाजप), अर्चना पाटील (शिवसेना शिंदे गट) तर नाडे पं. स.त तिरंगी लढत असून चंद्रशेखर ढवळे (भाजप), माजी जि.प. सदस्य विजय पवार (शिवसेना शिंदे गट), विकास कदम (राष्ट्रीय समाज पक्ष) हे निवडणुक लढत आहेत.
मारूल हवेली जि.प.ची दुरंगी लढत असून माजी पं.स. सदस्य संतोष गिरी यांच्या पत्नी योगिता गिरी (शिवसेना शिंदे गट), वैशाली गुरव (भाजप), मारूल हवेली पं. स. त तिरंगी लढत असून प्रियांका देसाई (शिवसेना शिंदे गट), पूनम मोरे (भाजप), विद्या सूर्यवंशी (राष्ट्रीय समाज पक्ष), नाटोशी पं .स.साठी तिरंगी लढतीत माजी पं.स. सदस्य रंगराव जाधव (भाजप), प्रशांत पवार (शिवसेना शिंदे गट), शांताराम सुर्वे (शिवसेना ठाकरे) हे उमेदवार आहेत.
मंद्रुळकोळे (ढेबेवाडी) जि. प.साठी दुरंगी लढतीत माथाडी नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्या भावजय व प्राना फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्राची पाटील (भाजपा), मृणाल पाटील (शिवसेना शिंदे गट), मंद्रुळकोळे पं.स. साठी पंचरंगी लढतीत ज्येष्ठ नेते हिंदुराव पाटील यांचे सुपुत्र नितीन पाटील (भाजप), नितीन काळे (शिवसेना शिंदे गट), अमरजित पाटील (रा. काँग्रेस), साहील भालेकर (शिवसेना उबाठा), विलास सावंत (अपक्ष), सणबूर पं .स.त दुरंगी लढतीत आकांक्षा खेडेकर (भाजपा), संपदा जाधव (शिवसेना शिंदेगट) हे निवडणूक लढवत आहेत.
काळगाव (कुंभारगाव) जि.प. साठी चौरंगी लढत असून येथून राष्ट्रीय खनिज महामंडळाचे संचालक व भाजप नेते ना. भरत पाटील यांच्या पत्नी प्राजक्ता पाटील (भाजपा), सुनीता चाळके (शिवसेना शिंदे गट), सीताबाई मोडक (शिवसेना ठाकरे), मेघना माने (अपक्ष), कुंभारगाव पं.स. साठी तिरंगी लढत असून येथून माजी उप सभापती रमेश मोरे (भाजप), संजय कळंत्रे (शिवसेना उबाठा), सचिन यादव (शिवसेना शिंदे गट), काळगाव पं.स. चौरंगी लढतीत अनिल डाकवे (भाजपा), माजी पं.स. सदस्य पंजाबराव देसाई (शिवसेना शिंदे गट), संदीप माने (शिवसेना ठाकरे), आदित्य मोरे (रा. काँग्रेस) हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
पाटण तालुक्यात ना. शंभूराज देसाई हे मंत्री झाल्यानंतर होणारी ही जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक ही त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेची बनली आहे. आत्तापर्यंत अपवाद वगळता नेहमीच ही सत्ता पाटणकर गटाकडेच राहिली आहे सन 2014 ते 2024 या कालखंडात भलेही विधानसभेत पराभव झाला असला तरी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या दरम्यानच्या काळातील सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यात पाटणकर गट यशस्वी राहिला आहे. आता पुन्हा एकदा सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या निवडणुकीत ते कशा पद्धतीने कडवी झुंज देत या राजकीय, सार्वत्रिक परिस्थितीवर मात करतात याकडेच संपूर्ण जिल्ह्याचे नेते राज्याचे लक्ष लागले आहे. अनेकांनी मैदानात उड्या घेतल्या आहेत. कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे.