परळी विधानसभा मतदारसंघ Pudhari File Photo
सातारा

परळी खोरे बाबाराजेंवर फिदा

राजूभैय्यांचा जलवा : विरोधकांना अवघे 2 हजार मतदान

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा तालुक्यातील परळी खोरे हा आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा बालेकिल्ला मानला जातो. विधानसभा निवडणुकीत हे स्पष्ट झाले असून 22 हजार 512 इतक्या झालेल्या मतदानापैकी तब्बल 20 हजार 321 मते बाबाराजेंना मिळाली. अमित कदम यांना अवघी 1517 मते मिळाली असून सर्व विरोधकांना मिळून कसाबसा 2 हजारांचा मतांचा टप्पा ओलांडता आला. या गटात विक्रमी मताधिक्य मिळवून देणारे आ. शिवेंद्रराजेंचे राईटहॅन्ड राजू भोसले हे किंगमेकर ठरले. त्याचबरोबर खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील मनोमीलनाचा फॅक्टरही गावागावांत चालला असून बाबाराजेंचा वरचष्मा कायम राहिला.

परळी खोर्‍यात येणार्‍या कारी गटात सुमारे 90 गावे व 45 ग्रामपंचायती आहेत. परळी खोरे हे पुर्वीपासुनच राजेंचा अभेद्य गड मानला जात आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत हा गट आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभा राहिला. परळी खोर्‍यातील आटाळी, मोरबाग, बोंडरवाडी या तीन गावांनी तर चक्क झालेले शंभर टक्के मतदान बाबाराजेंच्या पारड्यात टाकले आहे. सर्वच विरोधी उमेदवारांना भोपळा दिला आहे. धावली, भांबवली, पेट्री, वेणेखोल, मोरेवाडी, रायघर, अलवडी, अनावळेवाडी, जांभे, पवनगाव आदी काही गावांतील बुथवर मुख्य स्पर्धक असणार्‍या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमित कदमांना भोपळा व अन्य उमेदवारांना अपवादात्मक तीन ते चार मते मिळाली आहेत. त्यामुळे परळी खोर्‍याच्या करिष्म्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. परळी खोर्‍यातील राजेंचा गड आणखी मजबूत झाला आहे. त्यातच विरोधकांना वॉईटवॉश देण्याची किमया याच खोर्‍यातील गावांनी करुन दाखवली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रतिक्षा लागली आहे ती बाबाराजेंच्या मंत्रीपदाचीच.

परळी खोर्‍यात विरोधकांनाही आपलंस करून सोडण्याचा हातखंडा राजू भोसले यांच्याकडे आहे. या खोर्‍याचं नेतृत्व बळीभाऊ कदम आणि संपततात्या भोसले यांच्यानंतर गेली अनेक वर्ष राजूभैय्या भोसले हे खंबीरपणे करत आहेत. त्यांनी भागातील सर्व जनतेला सामावून घेत एकहाती वर्चस्व ठेवले आहे. त्यामुळे हा बालेकिल्ला दिवसेंदिवस मजबुत होत असून विरोधकांना गावागावात साधा बुथ लावणेही अवघड झाले होते. बाबाराजेंसाठी राजूभैय्यांच्या नेतृत्वात दोन्ही राजेगट व महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन एकदिलाने आणि जोमाने काम करताना दिसले. परळी गटात विधानसभा निवडणुकीत 22 हजार 512 मतदान झाले होते. त्यापैकी 20 हजार 321 मते बाबाराजेंना मिळाली आहेत. राजूभैय्यांनी बाबाराजेंच्या मताधिक्क्यासाठी योजलेली मोहीम फत्ते झाल्याचे बोलले जात आहे.

बाबाराजेंना कॅबिनेट मंत्रीपद द्या

विधानसभा निवडणुकीत राज्यात दोन नंबरच्या मताधिक्क्याने आ. शिवेंद्रराजे भोसले हे विजयी झाले आहेत. त्यातच आ. शिवेंद्रराजे हे पाचव्यांदा आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्री पद देण्यात यावे व त्यातही महत्वाचे मंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. सातारचे पालकमंत्री पदही त्यांनाच देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT