सातारा : सातारा नगरपालिकेने गणेशोत्सव काळात स्वच्छता, पर्यावरण व सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
सातार्यात गणेशोत्सवात प्लास्टिक किंवा कागदी तुकडे उडवणारे फटाके ‘सीओ टू पेपर ब्लास्टर’ तसेच इतर प्रकारचे प्लास्टिक व कागद उडणार्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास प्रदूषण (नियंत्रण व नियमबद्धता) अधिनियमांतर्गत दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिला आहे.
सातार्यात गणेशोत्सवात पारंपरिक मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. मात्र, अशावेळी मोठ्या आवाजाचे व प्रदूषण करणारे फटाके फोडल्याने तसेच प्लास्टिक किंवा कागदी तुकडे उडवल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो.
हा कचरा तातडीने स्वच्छ करणे कठीण व गैरसोयीचे होते. परिणामी परिसरात अस्वच्छता पसरून रोगराई व संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे यावर्षीपासून असे फटाके वापरावर पूर्ण बंदी आणण्यात आली आहे. 27 ऑगस्टपासून सातारा शहरात कोणत्याही मिरवणुकीत, सार्वजनिक कार्यक्रमात किंवा उत्सवात प्लास्टिक किंवा कागदी तुकडे उडवणारे फटाके व ‘सीओ टू पेपर ब्लास्टर’ वापरण्यास सक्त मनाई राहणार आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित जबाबदार व्यक्ती, आयोजक किंवा गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.