सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर शेंद्रे ते कागल या 133 किलो मीटर अंतरातील कामाचा चांगलाच बोर्या उडाला आहे. जानेवारी 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण व्हायला हवा होता. मात्र, प्रोजेक्टची मुदत संपूणही काम सुरुच ठेवावे लागले आहे. अदानी कंपनीने 1449.80 कोटी रुपयांना बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्वावर शेंद्रे ते पेठनाका या रस्त्याचा ठेका घेतला होता. तसेच डी. पी. जैन या कंपनीकडे हे काम दिले.
जैन यांच्या कंपनीने सोप्पी कामे करुन घेतली. मात्र, ठिकठिकाणच्या उड्डाणपुलांची कामे तशीच भिजत ठेवली. आता पेनल्टी लागण्याच्या भीतीने अदानींची पाचावर धारण बसली आहे. मुंबई, गुजरात, उत्तर प्रदेश येथून ठेकेदारांना पाचारण करुन त्यांच्यामार्फत रखडलेली कामे हाती घेण्यात आली आहेत.
दै. ‘पुढारी’ने या रस्त्यावर होणारे अपघात, वाहतूक कोंडीमुळे होणारे प्रवाशांचे हाल तसेच स्थानिक शेतकर्यांना येणार्या समस्यांबाबत आवाज उठवून या सगळ्यांचं ‘रोजचं मरण’ मांडलं होतं. त्याची दखल घेऊन जिल्ह्यातील तीन मंत्र्यांनी बैठक घेऊन महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, ठेकेदार यांना चांगलेच धारेवर धरले. कोल्हापुरात देखील लोकप्रतिनिधींनी ठेकेदाराचे कान पिळले. दै. ‘पुढारी’च्या पाठपुराव्यानंतर अदानी कंपनीला चांगलीच जाग आली आहे. डी. पी. जैन या कंपनीकडे असलेले 80 टक्के काम जवळपास पूर्ण झाले असले तरी उर्वरित 20 टक्के काम जे अवघड आहे, तेच रखडले आहे.
यामध्ये गावोगावच्या उड्डाणपुलांचा समावेश आहे. नागठाणे, अतित या ठिकाणी आता मोठ्या पुलांची कामे सुरु आहेत. याच कामांना गती मिळावी, या उद्देशाने अदानींनी मुंबई, गुजरात, उत्तर प्रदेश येथील आपल्या वेंडर कंपन्यांना शेंद्रे ते पेठनाका कामासाठी पाचारण केले आहे. राधेय, तृप्ती या कंपन्यांनी ही कामे हाती घेतली असून त्यांनीही कामे गतीने व्हावे, यासाठी काही सबकंपन्यांना कामे वाटून दिली आहेत.
दै. ‘पुढारी’च्या पाठपुराव्यानंतर सेवा रस्त्यावरील मोठाले स्पीड ब्रेकर काढून टाकण्याचे काम या कंपन्यांनी पहिल्यांदा केल्याने वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. सहापदरीकरणाच्या कामाचा पूर्णत्वाचा दाखला मिळणार नाही, तोपर्यंत या कामाची टोलवसुली करता येणार नाही. त्यामुळे जितके दिवस काम वाढेल, तेवढा दंड बसेल तसेच टोलवसुलीलादेखील ब्रेक लागेल, या भीतीने या कंपन्यांकडून गतीने कामे सुरु करण्यात आली आहेत. मात्र, पावसाळ्यात डांबरीकरणाची कामे कशी होणार? हा प्रश्न आहे.
शेंद्रे ते पेठनाका दरम्यान तासवडे (ता. कराड) येथे टोलनाका आहे. चार पदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. हा रस्ता रस्ते विकास महामंडळाकडून एनएआयकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. टोल आकारणीची मुदत संपली आहे. तर सहा पदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मग तासवडे टोलनाक्यावर टोलवसुली का सुरु आहे? असा सवाल वाहनधारक उपस्थित करत आहेत.