Jaykumar Gore 
सातारा

Pandharpur Corridor : पुढील आषाढी यात्रा कॉरिडॉरमध्ये भरणार

पालकमंत्री गोरे; जानेवारीपासून प्रत्यक्ष कॉरिडॉरच्या कामाला गती

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या चैत्री, कार्तिकी, माघी व आषाढी यात्रेला लाखो भाविक येतात. आषाढी यात्रेला तर २० लाखांहून अधिक भाविक येतात. या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याअनुषंगाने पंढरपुरात कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. त्याचे काम जानेवारीपासून प्रत्यक्षात सुरू केले जाणार आहे. त्यामुळे यंदाची आषाढी यात्रा ही विद्यमान व्यवस्थेतील शेवटची यात्रा ठरेल. पुढील वर्षीची आषाढी यात्रा कॉरिडॉरमध्ये भरविण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

आषाढी यात्रा नियोजनाच्या बैठकीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हे रविवारी पंढरपुरात आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, राष्ट्रीय महामार्गचे प्रकल्प संचालक अभिजित औटी उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे म्हणाले की, पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून, येथे येणाऱ्या लाखो भाविकांना पायाभूत सेवा देण्यासाठी सरकार सज्ज आहे. दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी एक कोटीहून अधिक भाविक येथे येतात. त्यामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उज्जैन आणि वाराणसीच्या धर्तीवर पंढरपुरात कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहे.

३,९९३ कोटी ९० लाख रुपयांचा कॉरिडॉरचा आराखडा तयार झाला आहे. यंदाची आषाढी यात्रा संपताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत कामाला अधिक वेग दिला जाईल. त्यामुळे पंढरपूरचे जुने रूप डोळ्यांत साठवून ठेवा, भाविकांना सेवासुविधा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या नव्या पंढरपूरचे रूपदेखील लवकरच डोळ्यासमोर येईल, असेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT