पाचगणी : खिंगर (ता. महाबळेश्वर) येथे मुंबईतील एकाने दुसऱ्याच्या जागेतून रस्ता देत फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. स्वत:च्या मालकीची जमीन विकण्यासाठी हा उद्योग केल्याचे समोर आले आहे.
संतोष विश्राम शिंदे (रा. 1705 बी विंग वेस्टर्न हाईटस, लालबाग, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत रोहिदास ज्ञानदेव सातपुते यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, संतोष व रोहिदास यांच्यात 13 गुंठे जमिनीचा व्यवहार झाला होता. याखेरीज संतोष याने रोहिदास यांना जमिनीला रस्ता देणार असल्याचे सांगितले. यासाठी संशयित संतोष शिंदे याने विक्री केलेल्या जमिनीच्या लगत असणाऱ्या एका खासगी जमिनीतून रस्ता गेल्याचे दाखवले. साक्षीदार साजिद नझीर क्षीरसागर यांच्याकडून निरंतर रस्ता वापरण्याचा करारनामा केल्याचे सांगून, तसा बनावट करारनामा तयार केला.
हा करारनामा दाखवून या जमिनीची विक्री केली. रोहिदास यांनी रस्त्याबाबत अधिक माहिती घेतली असता हा रस्ताच अस्तित्वात नसल्याचे समोर आले.त्यामुळे रोहिदास यांनी संतोष याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली. याची चौकशी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संतोष याने परिसरातील अनेकांची अशी फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाची फसवणूक झाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.