पाचगणी : पाचगणी शहरामध्ये उघड्यावरून कचरा वाहतूक करणार्या गाड्यांमुळे शहरात दुर्गंधी पसरत होती. याचा नागरिक व पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच वाहनातील कचरा सांडत असल्याने सर्वत्र घाणीघाण होत होती. यावर दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिध्द करताच पालिका प्रशासनाने याची दखल घेत कार्यवाही केली. कचरा वाहने ताडपत्रीने झाकली जात आहेत.
नगरपालिका क्षेत्रात दररोज कचरा गोळा करण्यासाठी फिरणारी कचरा वाहने उघड्यावरच कचरा वाहून नेत असल्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये दुर्गंधी पसरत होती. याचा त्रास विद्यार्थी, पालकांना जास्त सहन करावा लागत होता. कधी कधी कचरा रस्त्यावर सांडत असल्याने सर्वत्र घाणीघाण होत होती. यावर दै. ‘पुढारी’ने ‘पाचगणीत कचरा गाड्यामुळे दुर्गंधी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. याची पालिकेच्यावतीने दखल घेण्यात आली आहे. पालिकेची जी वाहने कचरा उचलतात त्यांना ताडपत्री देण्यात आली आहे. वाहन भरल्यानंतर त्यावर ताडपत्री बांधण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.