पाचगणी : पाचगणी-महाबळेश्वर दरम्यानचा मुख्य रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या मार्गावरील संजीवन नाका ते अंजुमन हायस्कूलपर्यंत खड्डे, उखडलेला रस्ता, खडी आणि उडणारा धुरळा यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे. या मार्गावरून दररोज एस.टी. बस, पर्यटकांची खाजगी वाहने तसेच मालवाहतूक गाड्या ये-जा करतात. मात्र, या वाहनांचा अति वेग आणि बेफिकीरपणा यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अतिवेगामुळे या रस्त्यावर काही दिवसापूर्वी अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
एस.टी. बस, मालवाहतूक ट्रक, खासगी बस आणि काही पर्यटकांची चारचाकी वाहने वेगमर्यादा न पाळता सुसाट धावत असल्याने मुख्य रस्त्यावर प्रचंड धुराळा उडत आहे. काही पर्यटक वळणदार रस्त्यावरही स्टंटसदृश ड्रायव्हिंग करत असल्याने माती आणी रस्त्यावरील पांढरी पावडर उडवत असून त्यामुळे दुचाकी आणि इतर वाहनचालक, पादचारी यांचा जीव धोक्यात आला आहे.
रस्त्यावर उडणाऱ्या धुरळ्यामुळे काही क्षणांसाठी अंधुक होऊन, परिणामी समोरून येणारी वाहने किंवा रस्त्यातील खड्डे दिसत नाहीत. याचा सर्वाधिक फटका दुचाकीस्वारांना बसत असून त्यांना अक्षरशः कसरत करत प्रवास करावा लागत आहे. डोळ्यात धुराळा जाणे, अचानक ब्रेक लावणे, वाहन घसरून पडणे किंवा किरकोळ धडकांच्या घटना होत आहेत. एखादी मोठी गाडी गेल्यास धुराळा उडत आहे कि मागे असणारी दुचाकी अक्षरशः धुरळ्याने अंघोळ करत आहेत. एका बाजूने काँक्रीट असल्याने रस्त्यावरून समोरील आलेली वाहने चुकवताना एका बाजूला वळतात आणि त्याच वेळी समोरून येणाऱ्या वेगवान वाहनांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. यावर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.