पाचगणी : पाचगणी-महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली आहे. महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक सध्या बेबी पॉईंट ते संजीवन नाका आणि पुढे गोकुळ हॉटेलमार्गे अंतर्गत रस्त्यांवरून वळवण्यात आली आहे. मात्र, हे रस्ते अरुंद असल्याने आणि त्या मार्गांवर शाळा असल्यामुळे आधीच वाहतुकीचा वेग मंदावलेला असताना महावितरणचे वीज खांब वाहनचालकांसाठी मोठा अडथळा ठरत आहेत.
या अंतर्गत मार्गांवर काही ठिकाणी वीज खांब रस्त्याच्या अगदी कडेला उभे असून काही खांब झुकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे बस, ट्रक आणि इतर मोठ्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. वळणावर दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतुकीचा पूर्णत: खोळंबा होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. विशेषतः पर्यटन हंगामात शनिवार-रविवारी पाचगणीत वाहनांची संख्या वाढते. अशावेळी या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी वाहतूक कोंडी वाढल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत.
रस्त्याच्या कडेला असलेले आणि झुकलेले वीज खांब वळण घेताना किंवा ओव्हरटेक करताना अडथळा निर्माण करतात. त्यामुळे खांबांना धक्का लागण्याची तसेच अपघात होण्याची शक्यता आहे. यासोबतच अशा घटनेमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो. मुख्य रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्ग सुरक्षित व सुलभ करणे आवश्यक आहे. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. यासाठी महावितरण विभागाने झुकलेले खांब दुरुस्त करावेत किंवा आवश्यकतेनुसार स्थलांतरित करावेत, अशी मागणी होत आहे.