सातारा

Panchgani News : स्वच्छ सर्वेक्षणात पाचगणी पॅटर्न देशात अव्वल

देशात द्वितीय क्रमांक : दिल्लीत राष्ट्रपतीच्या हस्ते गौरव

पुढारी वृत्तसेवा

पाचगणी : स्वच्छतेसाठी सातत्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने पुन्हा एकदा देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वच्छता, लोकसहभाग आणि नियोजनबद्ध कामाच्या जोरावर पाचगणी शहराने राष्ट्रीय स्तरावर आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ अंतर्गत २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पाचगणीने देशात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. दिल्ली येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पाचगणी शहराला हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सोहळ्याला केंद्रीय शहरी विकास व आवासन मंत्री मनोहरलाल खट्टर, राज्यमंत्री टोकन साहू तसेच केंद्रीय आवासन व शहरी मंत्रालयाचे सचिव संतेंद्र सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. पाचगणीचे नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे, नगरसेवक शेखर कासुर्डे, नगरसेवक गणेश कासुर्डे आणि शहर समन्वयक ओंकार ढोले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. देशातील विविध शहरांनी स्वच्छतेच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीची दखल या सर्वेक्षणातून घेण्यात आली. त्यामध्ये पाचगणीसारख्या छोट्या पर्यटन शहराने देशपातळीवर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

पाचगणी हे देश-विदेशातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. वर्षभर येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. विशेषतः पर्यटन हंगाम, सुट्ट्या आणि सण-उत्सवांच्या काळात शहरातील लोकसंख्येत मोठी वाढ होते. अशा परिस्थितीत शहर स्वच्छ ठेवणे, कचऱ्याचे योग्य संकलन व व्यवस्थापन करणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण करणे हे मोठे आव्हान असते. या आव्हानावर मात करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने सातत्याने प्रयत्न केले. त्याला नागरिकांचा सक्रिय सहभाग लाभल्याने पाचगणीला हे यश मिळवता आले.

या यशामध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्षा माधुरी कासुर्डे आणि आरोग्य सभापती राजश्री सणस, हिलदारी यांचे विशेष योगदान राहिले. शहराच्या स्वच्छतेसाठी आखण्यात आलेले नियोजन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय तसेच विविध स्तरांवर राबवण्यात आलेले स्वच्छता उपक्रम यामुळे या मोहिमेला बळ मिळाले. स्वच्छता ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश पाचगणीच्या यशातून अधोरेखित झाला आहे. या पुरस्कारामुळे पाचगणीच्या पर्यटन क्षेत्रालाही स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ म्हणून नवी ओळख मिळण्यास मदत होणार आहे.

माझी वसुंधरा अभियानातही पाचगणी प्रथम!

याआधीही ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानांतर्गत १५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपालिकांच्या गटात पाचगणीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत विकासासाठी सातत्याने राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे पाचगणीने राज्यात नव्हे तर देशात पर्यावरणपूरक शहर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

‘पाचगणी शहराला स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर द्वितीय क्रमांक मिळणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हे यश केवळ नगरपरिषद प्रशासनाचे नसून सर्व लोकप्रतिनिधी, सफाई कर्मचारी, स्वच्छतादूत आणि पाचगणीकर नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.
- पंडित पाटील, मुख्याधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT