सुरेश सूर्यवंशी
उंब्रज : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेल्या श्री खंडोबाची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत तसेच यात्रेला कोणतेही गालबोट न लागता पार पडली. जिल्हा प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत प्रशासन व यात्रा कमिटी यांच्या शिस्तबध्द नियोजन व समन्वयातून पाल यात्रा शांततेत पार पडल्याने सर्वच विभागांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
यावर्षी पाल यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवार होता. पुढे लगेच शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस आल्याने राज्यासह परराज्यातून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे गृहीत धरून जिल्हा प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत प्रशासन व यात्रा कमिटी यांनी योग्य ती दक्षता घेतली होती. त्यादृष्टीने नियोजन केले होते. जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांना यात्रा पूर्व नियोजन बैठकीत यात्रेच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये यात्रेस येणारा भाविक जसा सुरक्षित आला आहे, तसाच तो सुरक्षित घरी गेला पाहिजे, ही भावना व्यक्त करीत जिल्हाधिकारी यांच्याकडून यात्रेस येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता महत्वाची असल्याचे वारंवार सांगितले जात होते. त्यादृष्टीने पोलिस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसिलदार कल्पना ढवळे, यांनी सर्व विभागाची यंत्रणा कामाला लावली. प्रत्येक विभागाकडून यात्रेच्या अनुषंगाने कामे करूनच घेतली व यात्रा शोभनिय होण्यापेक्षा यात्रा सुरक्षित होणे महत्वाचे आहे, यादृष्टीने प्रशासनाने उपाययोजना केल्या.
यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी मुख्य मिरवणूकीवेळी मंदिर व मंदिर परिसरात भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होते. प्रशासनाच्या दृष्टीने हा प्रेशर पॉईंट रिकामा ठेवणे हे पोलिस प्रशासन यांच्यासाठी तारेवरची कसरत असते. गेल्या काही वर्षांपासून पोलिस प्रशासनाकडून हा प्रेशर पॉईंट रिकामा ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंदिराच्या मुख्य चौकात चारही बाजूने भाविकांची गर्दी ओसांडून वाहत असते व ही गर्दी आटोक्यात आणताना पोलिसांची दमछाक होते. मात्र याठिकाणी सुद्धा पोलिसांनी योग्य ती दक्षता घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जिल्हा गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेची विशेष पथक यात्रेत चोहीकडे विभागले होते. या पथकाने मुख्य मिरवणूकी पूर्वी अनेक खिसे कापू यांना ताब्यात घेतले होते. गुन्हा शाखेच्या टिमचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
यात्रेस येणाऱ्या भाविकांना श्री खंडोबाचे विनासायास दर्शन मिळावे याअनुषंगाने देवस्थान ट्रस्टने सर्व सोयीनीयुक्त प्रशस्त दर्शन बारीचे नियोजन केले होते. तसेच श्री खंडोबा मंदिर विद्युत रोषणाईने व फुलांच्या माळानी उजाळून निघाले होते. मंदिर व मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली होती. राज्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवासची सोय करण्यात आली होती.त्याचप्रमाणे ग्रामपंचायत प्रशासनाने भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतेची सोय, गावांतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा, रस्त्याची डागडुजी यासह यात्रा कमिटीने तारळी नदीपात्रातील उत्तर व दक्षिण वाळवंटाची स्वच्छता करून सपाटीकरण करण्याबरोबरच यात्रेस येणारे व्यावसायिकाना जागेचे वाटप, पाण्याची सोय, सार्वजनिक शौचालयाची सोय, स्ट्रीट लाईटची सोय आदी उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूकीला अडथळा होणार नाही यादृष्टीने नियोजन करण्यात आले होते. याच कालावधीत सातारा येथील साहित्य संमेलन, मांढरदेव यात्रा, औंध यात्रा आदींमुळे पाल यात्रेसाठी कमी प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. याचा ताण पोलिस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील व उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र भोरे यांना आला असला तरी पोलिस पाटील व होमगार्ड यांनी मोठ्या कुशलतेने बंदोबस्त यशस्वीपणे पार पाडून यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी मोठा हातभार लावला आहे. तसेच दर्शन घेतलेल्या भाविकांना बाहेर जाण्यासाठी हरपळवाडी मार्गावरील दरवाजामधून बाहेर सोडले जात होते. परिणामी मंदिराच्या आवारात भाविकांची जास्त गर्दी झाली नाही.
मांढरदेव यात्रेच्या दुर्घटनेपूर्वी पाल यात्रेतील पोलिस बंदोबस्त हा हाताच्या बोटावर मोजण्या इतपत असायचा. मात्र कधीही दुर्घटना घडली नाही. परंतु, मांढरदेव यात्रेच्या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यात्रेतील रूढी परंपराना फाटा देत मुख्य मिरवणूकीत बैलगाडी ऐवजी टॅक्ट्ररचा वापर, खोबऱ्याच्या वाट्याऐवजी तुकडे यांचा वापर करणे, काठी, कुऱ्हाड यांचा वापर करण्यास कायमस्वरूपी बंदी यासह मंदिर परिसरातील चौकातील प्रेशर पॉईंट रीकामा करणे, आदी प्रमुख बदल कसे फायदेशीर आहेत, हे तात्कालीन जिल्हाधिकारी सुबराव पाटील यांनी पाल यात्रेतील सर्व मानकरी यांना पटवून दिले. व हा बदल कितपत यशस्वी होतेय हे पाहण्यासाठी तात्कालिन जिल्हाधिकारी सुबराव पाटील हे स्वत: यात्रा कालावधीत तब्बल चार दिवस पाल येथे तळ ठोकून होते.
यात्रेच्या मुख्य दिवशी स्वत: हेलमेट घालून व हातात काठी घेवून मंदिराच्या मुख्य प्रवेशव्दारावर मुख्य मिरवणूक मार्गस्थ होईपर्यंत होते. यात्रेतील रूढी परंपरा यामध्ये एका वेळी बदल झाला नसला तरी हा बदल हळूहळू होत गेल्याने पाल यात्रा सुलभ व सुरक्षित होण्यास मदत झाली आहे. एकंदरीत देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत प्रशासन, यात्रा कमिटी व जिल्हा व तालुका प्रशासन यांच्या शिस्तबध्द नियोजन व समन्वयातून पाल यात्रा शांततेत पार पडली असेच म्हणावे लागेल.
पाल यात्रेसाठी पोलिस अधिकारी 19, पोलिस कर्मचारी 269, पोलिस पाटील 45, गृहरक्षक कर्मचारी 387 असा बंदोबस्त होता. एवढ्या कमी कर्मचारी संख्येमध्ये सुरक्षित व योग्य बंदोबस्तामध्ये यात्रा शांततेत पार पडली.- रविंद्र भोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, उंब्रज